नैराश्य
डिप्रेशन / From Wikipedia, the free encyclopedia
नैराश्य किंवा उदासीनता (इंग्रजी: Depression) ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते.[1] २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.[2]
जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यापैकी ७ कोटी (१८ टक्के) लोक एकट्या भारतात आहेत. यातील जवळपास ८० टक्के नैराश्यग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसते. सद्या भारतात सुमारे ४ हजार मानसोपचारतज्ज्ञ आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.[3] ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ३१% रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, इ.स. २०२० मध्ये नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा विकार असेल.[4]