![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/36/Muammar_al-Gaddafi_at_the_AU_summit.jpg/640px-Muammar_al-Gaddafi_at_the_AU_summit.jpg&w=640&q=50)
मुअम्मर अल-गद्दाफी
From Wikipedia, the free encyclopedia
मुअम्मर अबू मियां अल-गद्दाफी (अरबी: معمر القذافي (सहाय्य·माहिती), ७ जून १९४२ - २० ऑक्टोबर २०११) हा लिबिया देशाचा लष्करी अधिकारी, हुकुमशहा व सर्वोच्च नेता होता. १ सप्टेंबर १९६९ रोजी घडलेल्या लष्करी बंडानंतर त्याने लिबियाची सत्ता हाती घेतली. ४२ वर्षे सलग सत्ता उपभोगणाऱ्या गद्दाफीचा ह्या बाबतीत अरब जगतात अव्वल क्रमांक लागतो.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/36/Muammar_al-Gaddafi_at_the_AU_summit.jpg/640px-Muammar_al-Gaddafi_at_the_AU_summit.jpg)
सत्ता हाती घेतल्यानंतर गद्दाफीने आपल्या राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत केले व लिबियाचे संविधान बरखास्त करून आपल्या विचारधारेचे व पसंतीचे कायदे लागू केले. लिबियाच्या अर्थव्यवस्थेवर गद्दाफी कुटुंबीयांनी संपूर्ण ताबा मिळवला. लिबियन जनतेचे आयुष्य गद्दाफीच्या कारकिर्दीत अवघड व हलाखीचे होऊन बसले. गद्दाफीने लिबियातील प्रचंड खनिज तेल साठ्यांमधून मिळणारा पैसा अण्वस्त्रे मिळवण्यासाठी वापरला व अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना पाठिंबा दिला. ह्या कारणांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने तसेच जगातील अनेक देशांनी लिबियावर बहिष्कार टाकला होता.
अमेरिकेने सद्दाम हुसेनला पकडल्यानंतर गद्दाफीने आपले धोरण पूर्णपणे बदलले व लिबियाचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद करत असल्याची घोषणा केली. अचानकपणे लिबिया इतर देशांसोबत अनेक बाबतीत संपूर्ण सहकार्य करू लागला. २००६ साली अमेरिकेने लिबियासोबत राजकीय संबंध पुनःप्रस्थापित केले व इतर दहशतवादी राष्ट्रांना लिबियाचे उदाहरण अंमलात आणण्यास सुचवले.
२०११ च्या सुरुवातीस अरब जगतातील लोकशाहीवादी चळवळ लिबियामध्ये दाखल झाली व बंडखोरांनी लिबियामधील गद्दाफीची सत्ता झुगारून देण्यास आरंभ केला. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सहकार्यातून व लिबियन जनतेच्या पाठिंब्यामुळे लिबियातील पूर्व भागातील बेनगाझीमध्ये सुरू झालेली ही चळवळ देशभर पसरली व ऑगस्ट २०११मध्ये बंडखोर सेना त्रिपोलीमध्ये दाखल झाली. बंडखोरांनी त्रिपोली शहरावर पूर्णपणे कब्जा केला व गद्दाफी परागंदा झाला. तो सिरते ह्या आपल्या जन्मस्थळी लपून बसला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. बंडखोर सैन्याने लिबियाचा उर्वरित भाग ताब्यात घेतला व २० ऑक्टोबर २०११ रोजी सिरते येथे घडलेल्या एका चकमकीदरम्यान गद्दाफीला ठार मारण्यात यश मिळवले. त्याच वेळी गद्दाफीचा मुलगा मुतस्सिम हाही मारला गेल्याचे समजते.[1]
गद्दाफी हा कट्टर मुस्लिम होआ आणि त्याचा सर्वधर्मसमभावावर विश्वास नव्हता. त्याच्या विक्षिप्त स्वभावाचे अनेक किस्से सांगितले जातात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गद्दाफीवर मानवी हक्कांच्या पायमल्लीसाठी खटला भरला आहे. तसेच गद्दाफीची जगभर विखुरलेली अब्जावधी रुपयांची संपत्तीदेखील अनेक देशांनी जप्त केली आहे.