बाळाजी बाजीराव पेशवे
मराठा पेशवा From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना २५ जून १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण इ.स. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकद होती. परंतु १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्याने २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत

हा लेख बाळाजी बाजीराव पेशवे याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बाजीराव पेशवे (निःसंदिग्धीकरण).
Remove ads
सुरुवातीचे जीवन आणि पहिली कामगिरी
बाळाजी बाजीरावांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी मावळ मधील साते गाव णे येथे झाला. थोरले बाजीराव पेशवे हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती नानासाहेब म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती. थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली. बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. इ.स. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाला. शाहूचा वारस रामराजा हा सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होता तरीही बाळाजीने छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला.[ संदर्भ हवा ] त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक २५ सप्टेंबर, इ.स. १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावाने छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले.
Remove ads
राघोजी भोसल्यांचा ओरिसा भागात साम्राज्य विस्तार आणि पेशव्यांविरुद्ध विद्रोह
नानासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात राघोजी भोसले यांनी पूर्व हिंदुस्थानात मराठी राज्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले. पण त्यांचे पेशव्यांशी संबंध काही ठीक नव्हते. नानासाहेबांना पेशवाई देण्याच्या काही दिवस आधी राघोजींनी आपली एक फौज तंजावरच्या प्रतापसिंगांना मदत म्हणून दक्षिणेत पाठवली होती. तेथे अली दोस्त खानला संपवून राघोजींनी अर्काट राज्याच्या गादीवर नवाब म्हणून सफदर अली खानला बसविले. तदनंतर राघोजींनी साताऱ्यात येऊन पेशवेपदी नानासाहेबांच्या नियुक्तीविरोधात एक अयशस्वी बंड केले. पण मार्च १७४१ मध्ये अर्काटच्या गादीवर हक्क सांगण्याऱ्या चंदा साहिबने (जो अली दोस्त खानचा जावई होता) दक्षिणेत उचल खाल्ली त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी राघोजी दक्षिणेत उतरले. फ्रेंचांच्या मदतीने चंदाने राघोजीविरोधात मोठी आघाडी मिळवल्यामुळे मराठी सैन्याला मागे हटावे लागले. साताऱ्यात आल्यानंतर सुद्धा त्यांचा नानासाहेबांना विरोध शमायचे नाव घेत नव्हता.
१७४३ मध्ये राघोजींनी ओरिसा प्रांतात मराठी सैन्य घुसवून अलिवर्दी खानवर जबरदस्त हल्ला चढवला आणि ओरिसा, तत्कालीन बिहार आणि बंगाल प्रांतात चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्यास सुरुवात केली. १७५२ साल उजाडता उजाडता बंगाल, ओरिसा आणि बिहार मराठ्यांच्या ताब्यात आले.
Remove ads
ताराराणी आणि उमाबाई दाभाड्यांचा विद्रोह
छत्रपती राजारामच्या पत्नी महाराणी ताराबाई ही छत्रपती शाहूराजे भोसले यांची प्रतिस्पर्धी होती आणि त्यांच्याशी तिचे आणि कोल्हापूरकर छत्रपतींचे सलोख्याचे संबंध आहेत असा भासवायचा प्रयत्न करू लागली. शाहू महाराजांच्या उतरत्या काळात ताराबाईंनी एक मुलगा त्यांच्यासमोर पेश केला छत्रपती राजाराम (द्वितीय). आणि हा ताराबाईंचा नातू आहे असे त्यांनी शाहू महाराजांना सांगितले म्हणजेच शिवाजी महाराजांचा थेट वंशज आहे. शाहू महाराजांनी त्यास दत्तक घेतले आणि उत्तराधिकारी घोषित केले. १७४९ साली छत्रपती शाहूराजे भोसले यांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई आणि नानासाहेब पेशव्यांच्या उपस्थितीत छत्रपती राजाराम (द्वितीय) यांचा साताऱ्यात राज्याभिषेक करण्यात आला. पुढच्याच वर्षी नानासाहेब पेशवे दक्षिणेत निजाम राजवटीवर मोठी फौज घेऊन चालून गेले. या संधीचा फायदा उठवत ताराराणींनी नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर करा अशी छत्रपतींना गळ घातली. पण छत्रपतींनी या गोष्टीस नकार दिला. त्यांनी नकार देताच २४ नोव्हेंबर १७५० रोजी ताराराणीने सातारला वेढा टाकला आणि खुद्द छत्रपतींना अंधारकोठडीत कैद केले. पेशव्यांना बंडाची आणि छत्रपतींच्या अटकेची खबर मिळताच खुद्द पेशवे, मल्हारराव होळकरांसह फौज घेऊन सातारवर आपल्या धन्याची सुटका करण्यास निघाले. ताराबाईने छत्रपती हा एक तोतया आहे अस जाहीर केले. पण मंत्रिमंडळ आणि बहुतांश सरदारांनी पेशव्यांचा आणि छत्रपतींचा पक्ष स्वीकारला. सरतेशेवटी आपली हार होणार हे पाहताच ताराबाईने उमाबाई दाभाड्यांची मदत घेतली.
उमाबाई दाभाडे ही दाभाडे घराण्यातली एक कर्तबगार स्त्री होती. तिचे पती मुघलांशी लढताना ठार झाले होते तर तिचा मोठा मुलगा हा छत्रपतीविरुद्धच्या बंडात ठार झाला. दाभाडे घराण्यातली काही माणसांनी सरसेनापती ही पदवी ग्रहण केली होती. बंड शमल्यानंतर शाहूराजांनी उदारता दाखवत दाभाड्यांना माफ केले आणि गुजरातची जहागिर एका अटीवर दिली ती अट म्हणजे गुजरातेत जे काही उत्पन्न होईल त्याचा अर्धा भाग हा सातारच्या (राज्याच्या) खजिन्यात जमा करावयाचा आणि उमाबाईंच्या तान्ह्या धाकट्या मुलाला म्हणजेच यशवंतराव दाभाडेला सरसेनापती ही पदवी दिली. पण गुजरातेतील सर्व कारभार उमाबाई पाहू लागल्या. पण परिस्थितीने पुन्हा उचल खाल्ली आणि शाहूंच्या निधनानंतर संपत आलेला खजिना पुन्हा भरण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी दाभाड्यांवर कराराप्रमाणे अर्ध उत्पन्न सातारच्या खजिन्यात भरण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. १७५० मध्ये उमाबाई आणि पेशवे यांची भेट झाली. या भेटीत हा करार अवैध आहे, कारण तो दबावाखाली केला गेला आहे असा युक्तीवाद उमाबाईंनी केला आणि खजिना भरण्यास नकार दिला. छत्रपती आणि त्यांच्या सरदारांमधील तेढ वाढतच होता.
शेवटी उमाबाईंनी ताराराणीच्या मदतीसाठी दामाजीराव गायकवाड यांच्या अख्त्यारित १५ हजारची सेना देऊन सातारावर चढाई करण्यास पाठविले. दामाजी गायकवाडनी फौज अचानक पुण्याकडे वळवली. यामुळे नानासाहेबांच्या मातोश्री काशीबाई आणि त्यांच्या आजी राधाबाई यांना सिंहगडावर आश्रय घ्यायला लागला. पारगाव खंडाळानजीक छावणी पडलेली असताना दामाजीला महादजी पुरंदऱ्यांचा एक खलिता आला. त्या खलित्यात छत्रपती राजाराम (द्वितीय) यांनी दामाजीला फितूर घोषित केले आणि त्यास ताबडतोब शरणागती पत्कारण्याचा आदेश दिला. हा खलिता मिळताच दामाजीने सर्व फौज घेतली आणि रातोरात खंबाटकी घाट उतरला आणि साताऱ्याला वेढा घालण्यासाठी सुसाट निघाला. दामाजी राजधानीवर चालून येतोय ही खबर मिळताच त्र्यंबकराव पुरंदरे यांनी २० हजाराची तगडी फौज घेऊन दामाजीवर निंब गावानजीक एकाकी झडप घातली. त्र्यंबकरावचा ह्या लढाईत सपाटून पराभव झाला आणि साताऱ्याला दुर्देवाने ताराबाई आणि दामाजी यांच्या संयुक्त फौजांचा वेढा पडला. परंतु १५ मार्च १७५१ रोजी फौज पुन्हा उभी करत त्र्यंबकरावने जोमाने वेण्णा नदीजवळील दामाजीच्या छावणीवर हल्ला चढविला. हा हल्ल्यात दामाजीचे मोठे नुकसान झाले आणि त्यास माघार घ्यावी लागली आणि सातारा शहर फितुरांच्या कचाट्यातून मुक्त झाले. त्र्यंबकरावने दामाजीला रेटत रेटत कृष्णा नदीपर्यंत आणले.
बिदरवर चढाईच्या मनसुब्यात असलेल्या नानासाहेब पेशव्यांना दामाजी आणि ताराराणीच्या बंडाची खबर मिळताच सर्व खाशी फौज घेऊन त्यांनी साताऱ्यास कूच केली. केवळ १३ दिवसात ४०० मैलांचे अंतर तुडवत नानासाहेबांचे घोडदळ साताऱ्यास आले. छत्रपतींनीही त्यांच्या अख्त्यारित फौजांना पेशव्यांना मिळण्याचा हुकुम सोडला. २४ एप्रिलला फौजांनी यवतेश्वरच्या छावणीवर हल्ला करत दामाजीला पहिला धक्का दिला. त्र्यंबकरावही फौज घेऊन पेशव्यांच्या फौजेला येऊन मिळाले. युद्धात हार होत आहे हे समजताच दामाजीने युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला. पेशव्यांनी दामाजीकडे अर्धा गुजरात आणि युद्ध खर्चासाठी रुपये २५ लक्ष छत्रपतींच्या खजिन्यात भरण्यास सांगितले. दामाजीने ह्याला विरोध केला. त्यांनी ह्याबाबत उमाबाईंशी बोलण्याचा आग्रह पेशव्यांपुढे धरला. ३० एप्रिल रोजी पेशव्यांनी दामाजीवर हल्ला चढवला, दामाजीच्या थकलेल्या फौजेने कोणताही विरोध न करता शस्त्र टाकले. त्यानंतर नानासाहेबांनी साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा घातला आणि छत्रपती राजाराम (द्वितीय) यांना कैदेतून मुक्त करा असा खलिता ताराराणीला अजिंक्यतारावर पाठवला.
Remove ads
समाधी
नानासाहेब पेशवे यांची समाधी पुण्यात मुठा नदीकाठी पूना हॉस्पिटलजवळ आहे.
पुरस्कार
पुण्याचे देवदेवेश्वर संस्थान दरवर्षी ’श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार’ देते. २०१६ साली हा पुरस्कार डॉ. यू.म. पठाण आणि संस्कृतचे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांना प्रदान झाला. हे देवदेवेश्वर संस्थान पुण्यातील पर्वतीवरील देवळांची व्यवस्था पाहते.
नानासाहेबांवरील पुस्तके
- श्री देवदेवेश्वर संस्थान (व. कृ. नूलकर)
- बाळाजी बाजीराव (महादेव विनायक गोखले)
पहा
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads