पवित्र हिंदू ग्रंथ From Wikipedia, the free encyclopedia
भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
वेद | |
---|---|
ऋग्वेद · यजुर्वेद | |
सामवेद · अथर्ववेद | |
वेद-विभाग | |
संहिता · ब्राह्मणे | |
आरण्यके · उपनिषदे | |
उपनिषदे | |
ऐतरेय · बृहदारण्यक | |
ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
केन · मुंडक | |
मांडुक्य ·प्रश्न | |
श्वेतश्वतर ·नारायण | |
कठ | |
वेदांग | |
शिक्षा · छंद | |
व्याकरण · निरुक्त | |
ज्योतिष · कल्प | |
महाकाव्य | |
रामायण · महाभारत | |
इतर ग्रंथ | |
स्मृती · पुराणे | |
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
पंचतंत्र · तंत्र | |
स्तोत्रे ·सूक्ते | |
मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
शिक्षापत्री · वचनामृत |
५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर आहे.
भगवद्गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हणले आहे. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते.
कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवले. (श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीलाही दाखविले आहे!)
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे. इस्कॉन संघटना भगवद्गीता सर्व लोकांना पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
महाभारतातल्या 'भीष्म पर्वा'मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५व्यापासून ते ४२व्या अध्यायांत संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायली' जाते.
उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता 'महर्षी व्यास' यांनी लिहिली असे मानले जाते.
छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली. हिंदुस्थानातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकांच्या मतापेक्षा गीता कित्येक वर्षे जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते आध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहिली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही.
भगवद्गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडांत इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, कपिलगीता, गणेशगीता, पराशरगीता, भिक्षुगीता, व्यासगीता, रामगीता, शिवगीता, सूर्यगीता, हंसगीता, इतकेच काय, पण यमगीताही लिहिली गेली. कूर्मपुराणात उत्तर विभागात पहिल्या अकरा अध्यायांत ईश्वरगीता तर पुढील अध्यायांत व्यासगीता आहे. गणेशपुराणात शेवटच्या क्रीडा खंडात १३८ ते १४९ अध्यायांत गणेशगीता आहे.[1]
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ १८.६६ ॥
सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस.
अध्याय | शीर्षक | श्लोक |
पहिला | अर्जुनविषादयोग | ४७ |
दुसरा | सांख्ययोग(गीतेचे सार) | ७२ |
तिसरा | कर्मयोग | ४३ |
चौथा | ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान) | ४२ |
पाचवा | कर्मसंन्यासयोग | २९ |
सहावा | आत्मसंयमयोग | ४७ |
सातवा | ज्ञानविज्ञानयोग | ३० |
आठवा | अक्षरब्रह्मयोग | २८ |
नववा | राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान) | ३४ |
दहावा | विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य) | ४२ |
अकरावा | विश्वरूपदर्शनयोग | ५५ |
बारावा | भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा) | २० |
तेरावा | क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग | ३४ |
चौदावा | गुणत्रयविभागयोग | २७ |
पंधरावा | पुरुषोत्तमयोग | २० |
सोळावा | दैवासुरसंपद्विभागयोग | २४ |
सतरावा | श्रद्धात्रयविभागयोग | २८ |
अठरावा | मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष) | ७८ |
एकूण श्लोक | ७०० |
गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती| ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी|| अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी| वेदत्रयी, परा, अनंता, तत्त्वार्थज्ञानमंजिरी||
ही गेय स्वरूपातली गीतेची अठरा नावे नित्य घेतल्यास गीता पठणाचे पुण्य लाभते, अशी मान्यता आहे. [2]
१ ऐतिह्य कथन, २ दैन्य प्रदर्शन, ३ श्रीकृष्णास शरण, ४ आत्मप्रबोधन, ५ स्वधर्मपालन, ६ बुद्धियोग, ७ स्थितप्रज्ञता, ८ कर्मयोग, ९ नित्यकर्म, १० लोकसंग्रह, ११ शासनपालन, १२ शत्रुसंहार, १३ जन्मकर्म, १४ कर्म-अकर्म, १५ प्राज्ञमुखें ज्ञान, १६ सांख्ययोग, १७ सदामुक्तता, १८ योगारुढ होणें, १९ समाधि अभ्यास, २० शाश्वत योग, २१ एकसूत्रता, २२ शरणता, २३ मोह त्यागून ज्ञानविज्ञान साधन, २४ संतत स्मरण, २५ भूत लय-उत्पत्ति, २६ बोधक्षयोदय, २७ ईश्वरी सत्त, २८ हरिभावना, २९ निष्काम भक्ति, ३० ईशस्मरण, ३१ विभूतिसंक्षेप, ३२ विभूतिविस्तार, ३३ ईश्वरी रूप, ३४ ईश्वरी रूपावलोकन, ३५ क्षमापनस्तोत्र, ३६ रूपविसर्जन, ३७ भक्ततुलना, ३८ सुलमसाधन, ३९ ईश्वरगुणगान, ४० क्षेत्राक्षेत्रशोधन, ४१ प्रकृतित्याग, ४२ निर्लिप्त आत्मता, ४३ त्रिगुण संसार, ४४ गुणमुक्तता, ४५ वृक्ष (अश्वत्थ) छेन्न, ४६ जीवात्मादर्शन, ४७ जीवनव्याघ्र, ४८ पुरुषोत्तम, ४९ दोन संपदा, ५० असुरवर्णन, ५१ शास्त्रीय संयमानें नरकद्वार टाळणें, ५२ श्रद्धाविभाग, ५३ स्वाभाविक गुण, ५४ आहार यज्ञाचारण, ५५ ॐ तत्सदर्पण, ५६ त्यागमीमांसा, ५७ कर्मनिर्णय, ५८ त्रिधावृत्ति, ५९ पूर्णसाधना व ६० अर्जुनबोध, हीं साठ गीतेचीं अधिकरणें अथवा विषय होत.
हिंदू धर्मातील धार्मिक महत्त्वाबरोबरच भगवद्गीतेने अनेक विचारवंत, संगीतकारांना प्रभावित केले आहे, जसे की अरविंद घोष, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, आल्डस हक्सली, हेन्री थोरो, जे. रॉबर्ट ऑपनहाइमर, राल्फ वाल्डो इमर्सन, कार्ल गुस्टाफ युंग, ब्युलेंट एसेव्हिट हेर्मान हेस, हाइनरिश हिमलर, जॉर्ज हॅरिसन, निकोला टेस्ला आणि इतर. सध्याच्या स्वरूपातील कर्मयोगाच्या सिद्धांताचा मुख्य स्रोत भगवद्गीता ही आहे.[3][4][5]
भगवद्गीतेबद्दल शंकराचार्यांचे मत:
"भगवद्गीतेच्या स्पष्ट ज्ञानाने मानवी अस्तित्वाची सर्व उद्दिष्टे पूर्ण होतात. भगवद्गीता हे वैदिक धर्मग्रंथातील सर्व शिकवणींचे प्रकट रूप आहे."
आचार्य रामानुज (1017-1137) हे आदि शंकराचार्यांसारखे होते, जे विशिष्ठद्वैत वेदांताचे महान प्रतिपादक होते.
"भगवान कृष्णाने सर्व आध्यात्मिक ज्ञानाचे सार असलेल्या ईश्वराच्या भक्तीचे विज्ञान प्रकट करण्यासाठी भगवद्गीतेचे ज्ञान अवतरित केले होते." अवतरण आणि अवतार घेण्यामागील परम भगवान श्रीकृष्णाचा मुख्य उद्देश अध्यात्मिक विकासाला विरोध करणार्या कोणत्याही राक्षसी आणि नकारात्मक, अनिष्ट प्रभावांपासून जगाला मुक्त करणे हा आहे, तरीही त्याच वेळी सर्व मानवजातीच्या आवाक्यात राहणे हा त्यांचा अतुलनीय हेतू आहे."[6]
भगवद्गीता जशी आहे तशी चे लेखक: "आमचा एकमेव उद्देश, भगवद्गीता जशी आहे तशी मांडणे हा आहे, ज्या उद्देशाने कृष्ण ब्रह्मदेवाच्या दिवसातून एकदा किंवा दर ८,६०,००,००,००० वर्षांनी या ग्रहावर अवतरतात त्याच उद्देशासाठी कंडिशन केलेल्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे. हा उद्देश भगवद्गीतेमध्ये सांगितला आहे, आणि तो जसा आहे तसा स्वीकारावा लागेल. अन्यथा भगवद्गीता आणि त्याचे वक्ते भगवान कृष्ण, यांना समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात काहीही अर्थ नाही. भगवान कृष्णाने काही शे कोटी वर्षांपूर्वी प्रथम भगवद्गीता सूर्यदेवाला सांगितली. आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे आणि अशा प्रकारे भगवद्गीतेचे ऐतिहासिक महत्त्व चुकीचा अर्थ न लावता समजून घेतले पाहिजे. कृष्णाच्या इच्छेचा कोणताही संदर्भ न घेता भगवद्गीतेचा अर्थ लावणे हा सर्वात मोठा अपराध आहे. या अपराधापासून स्वतःला वाचवायचे असेल तर भगवंताला परमात्मस्वरूप समजले पाहिजे. जे की भगवान कृष्णाचे पहिले शिष्य अर्जुनाने प्रत्यक्षपणे समजून घेतले होते. भगवद्गीतेची अशी समज खरोखर फायदेशीर आहे आणि जीवनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मानवी समाजाच्या कल्याणासाठी अधिकृत आहे."[7]
स्वामी विवेकानंदांना भगवद्गीतेमध्ये खूप रस होता. असे म्हणले जाते की, भगवद्गीता त्यांच्या दोन सर्वात आवडत्या पुस्तकांपैकी एक होती (दुसरा एक होता ख्रिस्ताचे अनुकरण). १८८८-१८९३ मध्ये जेव्हा विवेकानंद संन्यासी म्हणून संपूर्ण भारतभर भटकंती करत होते, तेव्हा त्यांनी फक्त दोनच पुस्तके आपल्याजवळ ठेवली - गीता आणि इमिटेशन ऑफ क्राइस्ट.[8]
'भगवद्गीतेचा निःस्वार्थ सेवेवर भर' हा महात्मा गांधी यांच्यासाठी प्रमुख प्रेरणास्रोत होता. गांधीजीनी म्हणले होते की- "जेव्हा मला काही शंका सतावतात, निराशा माझ्या चेहऱ्यावर डोकावते आणि मला आशेचा एकही किरण क्षितिजावर दिसत नाही, तेव्हा मी भगवद्गीतेकडे वळतो आणि मला दिलासा देणारा श्लोक शोधतो; आणि प्रचंड दुःखाच्या सगरात मी लगेच हसायला लागतो. जे गीतेचे चिंतन करतात त्यांना दररोज नवनवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतील."[9]
श्री अरबिंदो यांच्या म्हणण्यानुसार, " भगवद्गीता हा मानवजातीचा खरा धर्मग्रंथ आहे, ज्यामध्ये प्रत्येक युगासाठी नवीन संदेश आणि प्रत्येक सभ्यतेसाठी नवीन अर्थ आहे."[9]
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी असे म्हणले आहे की " भगवद्गीता मूलत: मानवी अस्तित्वाच्या आध्यात्मिक पायाशी संबंधित आहे. ती जीवनातील जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पूर्ण करण्यासाठीच्या कृतीची साद आहे."[10]
"अध्यात्मिक माणसाला एकांतवासात राहण्याची गरज नाही, दैवी जीवनाशी एकरूप होणे आणि सांसारिक घडामोडींमध्ये टिकून राहणे शक्य आहे. त्या मिलनाचे अडथळे आपल्या बाहेर नसून आपल्या आत आहेत - हा भगवद्गीतेचा मुख्य धडा आहे." - अॅनी बेझंट[11]
"हे लक्षात घ्या, अध्यात्माला कोणतेही धार्मिक अभिव्यक्ती नसतात. अध्यात्माचे सार हे माणसाला त्याचे मन आणि त्याचे विचार शुद्ध करणे असे आहे. जेव्हा मी "भगवद्गीता" सारखे जुने धर्मग्रंथ वाचायला सुरुवात केली तेव्हा मला ते दैनंदिन जीवना करिता उपयुक्त वाटले. आणि म्हणून मग मी त्याचा सराव करू लागलो. मी याला प्रशासकीय अंतिम सत्य मानतो, जे तुम्हाला संस्था चालवण्यासारख्या गोष्टी करण्यात मदत करेल."[12]
एपीजे अब्दुल कलाम, भारताचे ११वे राष्ट्रपती, हे मुस्लिम असूनही भगवद्गीता वाचायचे आणि मंत्रांचे नियमित पठण करायचे.[13][14]
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवद्गीता "जगाला भारताची सर्वात मोठी देणगी" असे ठामपणे मांडले आहे.[15] मोदींनी २०१४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 'भगवद्गीता ॲक्कॉर्डींग टू गांधी' ची एक प्रत भेट म्हणून दिली होती.[16][17]
सुनीता विल्यम्स, अनिवासी भारतीय अमेरिकन अंतराळवीर जिने एक महिला म्हणून सर्वात जास्त काळ अंतराळात उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे, तिने तिच्यासोबत भगवद्गीता आणि उपनिषदांची प्रत अंतराळात नेली होती. ती म्हणते, "स्वतःवर, जीवनावर, आपल्या सभोवतालच्या जगावर चिंतन करण्यासाठी आणि इतर मार्गाने पाहण्याच्या या अध्यात्मिक गोष्टी आहेत, मला वाटले की ते अगदी योग्य आहे." तिच्या अंतराळातील कलावधीवर बद्दल बोलताना असे तिने प्रतीपादित केले.[18]
मॅनहॅटन प्रकल्पाची ट्रिनिटी चाचणी ही अण्वस्त्राचा पहिला स्फोट होता, ज्याने ओपेनहाइमरला भगवद्गीतेतील श्लोक आठवण्यास प्रवृत्त केले.
जे. रॉबर्ट ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि मॅनहॅटन प्रकल्पाचे संचालक, यांनी १९३३ मध्ये संस्कृत भाषा शिकली आणि मूळ संस्कृत भगवद्गीता वाचली. तत्पश्चात त्यांच्या जीवनाच्या तत्त्वज्ञाला वळण देणारे सर्वात प्रभावशाली पुस्तक म्हणजे भगवद्गीता होय असे त्यांनी उद्धृत केले.[19] ओपेनहायमरने असे सांगितले की, ट्रिनिटी अणुचाचणीचा स्फोट पाहत असताना, त्यांना भगवद्गीतेतील एक श्लोक उत्स्फूर्तपणे उच्चारला (XI,12):
“ | दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता। यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः।।११-१२।।[20] अर्थात- जर हजार सूर्याचे तेज एकाच वेळी आकाशात फुटले तर ते पराक्रमी तेजाचे अद्भुत दिलखेचक दृष्य असेल...[21][22] | ” |
काही वर्षांनंतर त्यांनी असे देखील म्हणले की त्या वेळी त्यांच्या डोक्यात आणखी एक श्लोक आला होता:
आपल्याला माहित आहे की हे जग एकसारखे राहणार नाही. काही लोक हसले, काही लोक रडले आणि बहुतेक लोक गप्प होते. मला भगवद्गीता या हिंदू धर्मग्रंथातील एक श्लोक आठवला; विष्णू राजपुत्राला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला प्रभावित करण्यासाठी, त्याचे विराटरूप धारण करतो आणि म्हणतो, 'आता मी मृत्यू; जगाचा नाश करणारा आहे.' मला असे वाटते की आम्ही सर्वांनी येनकेन प्रकारे हाच विचार केला.[23][lower-alpha 1]
हॉलिवूड अभिनेता, विल स्मिथ: मी येथे (भारतात) अनेक वेळा आलेलो आहे. मला इतिहासाची आवड आहे. माझे ९० टक्के व्यक्तिमत्व 'भगवत गीता'द्वारे आहे... आणि ती वाचण्यासाठी आणि येथे येण्यासाठी, माझ्या अंतरंगातील अर्जुनाला दिग्दर्शित केले जात आहे. पुढच्या वेळी मी ऋषिकेशला जाणार आहे. मी नक्कीच इथे अधिक काळ घालवणार आहे.[25]
हेन्री थोरो यांनी असे लिहिले की,
"सकाळी मी माझ्या बुद्धीला भगवद्गीतेच्या अद्भूत आणि वैश्विक तत्त्वज्ञानाने स्नान घालतो ज्याच्या तुलनेत आपले आधुनिक जग आणि त्याचे साहित्य तुच्छ आणि क्षुल्लक वाटते."[26]
हर्मन ग्राफ कीसरलिंग, जर्मन तत्ववेत्ता भगवद्गीता "कदाचित जगातील साहित्यातील सर्वात सुंदर कार्य" असे मानतात.[27]
हेर्मान हेस यांना असे वाटले की," भगवद्गीतेचे चमत्कार हे जीवनातील ज्ञानाचे खरोखर सुंदर प्रकटीकरण आहे जे तत्वज्ञानाला धर्मात फुलण्यास सक्षम करते."[9]
राल्फ वाल्डो एमर्सन यांनी भगवद्गीतेबद्दल असे म्हणले: "मला भगवद्गीतेचा एक भव्य दिवस लाभला आहे. जणू काही एक साम्राज्य आपल्याशी बोलले, लहान किंवा अयोग्य असे काहीही नसते, परंतु विशाल, शांत, सुसंगत प्राचीन बुद्धिमत्तेची अशी साद आहे ज्याने दुसर्या युगात आणि वातावरणात विचार केला होता आणि अशा प्रकारे त्याच प्रश्नांचे निराकरण केले आणि आपल्याला एक धडा शिकवला."[28]
विल्हेल्म फॉन हम्बोल्ट यांनी गीता असे उच्चारले: "सर्वात सुंदर, कदाचित कोणत्याही ज्ञात भाषेत अस्तित्वात असलेले एकमेव खरे तात्विक गाणे... कदाचित जगाला दाखविण्याची सर्वात खोल आणि उदात्त गोष्ट आहे."[29]
तुर्कीचे माजी पंतप्रधान मुस्तफा ब्युलेंट एसेव्हिट यांना विचारले असता त्यांना तुर्कीचे सैन्य सायप्रसला पाठवण्याचे धैर्य कशामुळे मिळाले. त्यावर त्याचे उत्तर असे होते की,"त्यांना भगवद्गीतेने बळ दिले होते, जी शिकवते की जर कोणी नैतिकदृष्ट्या योग्य असेल तर, अन्यायाविरुद्ध लढण्यास संकोच करू नये".[30]
ब्रिटिश भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स यांनी लिहिले: "मी गीतेचा उच्चार करण्यास संकोच करत नाही, ही उत्कृष्ट मौलिकता, संकल्पनेची उदात्तता, तर्क आणि शब्दलेखन जवळजवळ अतुलनीय आहे; आणि मानवजातीच्या सर्व ज्ञात धर्मांमध्ये एक अपवाद आहे..."[31]
"आम्हाला भगवद्गीतेसारख्या उदात्त सृष्टीकडे पूर्ण समज देऊन जायचे असेल तर आपल्या आत्म्याला त्याच्याशी जुळवून घेणे आवश्यक आहे." - रुडॉल्फ स्टेनर[32]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.