आषाढी एकादशी
आषाढ महिन्यातील एकादशी तिथी From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी, ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे.[१] हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला 'देवशयनी आषाढी एकादशी' असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

Remove ads
तिथी
हिंदू पंचांगप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष पंधरवडे असतात, त्यामुळे दोन तिथी असतात, एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी. म्हणून आषाढ महिन्यात एकादशी दोनदा येते, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात.
प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११व्या तिथीला एकादशी म्हणले जाते. चांद्रमास गणनेतील फरकामुळे तिथीची वृद्धी झाल्यास स्मार्त आणि भागवत एकादशी, असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद येतात. त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी ‘स्मार्त’ व दुसऱ्या दिवशी ‘भागवत’, असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात ‘स्मार्त’ आणि ‘भागवत’, अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते. परंतु, भागवत एकादशीला नाव नसते.
अधिक मास आल्यास अधिक महिन्याच्या आणखी दोन एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते. अशावेळी निज महिन्यातील तिथी ग्राह्य धरली जाते.[२][३][४]
Remove ads
धार्मिक मान्यता
देवशयनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात (एक वैश्विक महासागर) शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरि शयनी एकादशी असे म्हणले जाते.[५] यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात. हा काळ चतुर्मास (चार महिने) म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो. शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात असते. या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात.[६]
Remove ads
महत्व

भविष्योत्तर पुराणात, कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे, कारण निर्माता-देव ब्रह्मदेवाने त्यांच्या पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते. राजा मंडताची कथा याच संदर्भात सांगितली आहे. धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्षे दुष्काळ पडला होता, परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही. अखेरीस, अंगिरस ऋषींनी राजाला देव-शयनी एकादशीचे व्रत (व्रत) पाळण्याचा सल्ला दिला. असे केल्यावर विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला.
पंढरपूर वारी

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात.[७] चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, मुक्ताईनगर येथून मुक्ताबाई यांची, उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते.[८][९]
Remove ads
उपासना आणि उपवास

आषाढी एकादशीनिमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात.[१०] स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते.[११] या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे.[१२]
या दिवशी दुपारी आणि रात्री भोजनात उपवासाचे विशेष पदार्थ सेवन केले जातात. यासाठी राजगिरा, साबुदाणा, बटाटा, रताळे, शेंगदाणे यापासून तयार केलेले पदार्थ सेवन केले जातात.[१३]
चित्रदालन
- भजनात दंग वारकरी
- भजन गाणाऱ्या वारकरी महिला
- पंढरपूर विठोबा मंदिर
हे सुद्धा पहा
- एकादशी
- आषाढी वारी (पंढरपूर)
- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
- संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
- चातुर्मास
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads