भारताचा स्वातंत्र्यलढा
ब्रिटिशांविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळ (१८५७ - १९४७) From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची एक मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटिश राजवट संपवणे हा होता. हा स्वातंत्र्यलढा १८५७ ते १९४७ या काळात चालला.[१]

भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिली राष्ट्रवादी क्रांतिकारी चळवळ बंगालमधून उदयास आली होती. प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या चळवळीचा पाया भक्कम केला. हे नेते भारतीय लोकांच्या नागरी सेवा परीक्षांना बसण्याच्या अधिकारासाठी तसेच अधिक आर्थिक अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात लाल बाल पाल, अरविंद घोष आणि व्हीओ चिदंबरम पिल्लई यांनी स्वराज्यासाठी अधिक मूलगामी दृष्टीकोन पाहिला.[२]

१९२०मधील स्वराज्य संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या धोरणाचा अवलंब केला. रवींद्रनाथ टागोर, सुब्रमण्यम भारती आणि बंकिमचंद्र चटोपाध्याय यांसारख्या अनेक विचारवंतांनी देशभक्तीची भावना जनमानसात पसरवली. तर सरोजिनी नायडू, प्रीतिलता वड्डेदार आणि कस्तुरबा गांधी यांसारख्या महिला नेत्यांनी महिलांना स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजातील वंचित घटकांना मदत केली.[३]
तर काही नेत्यांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब केला. सशस्त्र क्रांती विशेषतः रौलेट कायद्यानंतर लोकप्रिय झाली. या कायद्याने लोकांना अनिश्चित काळासाठी तुरुंगात डांबण्याची परवानगी ब्रिटिश सरकारला परवानगी दिली होती. या कायद्याविरोधात संपूर्ण भारतभर विशेषतः पंजाब प्रांतात निषेध झाला. पंजाबमधील जालियनवाला बाग हत्याकांडाद्वारे ब्रिटिशांनी हे आंदोलन हिंसकपणे दडपले. भगतसिंग, शिवराम राजगुरू, सुखदेव थापर, चंद्रशेखर आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या क्रांतिकारकांनी काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळे निराश होऊन हिंसक मार्गांचा अवलंब सुरू केला. बोस यांनी अक्षीय शक्तींशी स्वतःला प्रसिद्धी दिली आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. यादरम्यान भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांनी प्रमुख ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली आणि सरकारी इमारतींवर बॉम्बस्फोट केले.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सतत वैचारिक उत्क्रांती होत होती. मूलतः वसाहतविरोधी असलेली ही चळवळ धर्मनिरपेक्षता, लोकशाही, प्रजासत्ताक आणि नागरी-स्वातंत्र्यवादी अशा विचारांच्या राजकीय संरचनेसह स्वतंत्र, आर्थिक विकासाच्या दृष्टींनी पूरक होती. १९३० नंतर या लढ्याने एक मजबूत समाजवादी प्रवृत्ती स्वीकारली. स्वातंत्र्य आंदोलनामुळे शेवटी भारतीय स्वातंत्र्य कायदा, १९४७ तयार होऊन भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली.
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू होऊन भारतीय प्रजासत्ताकची स्थापना होईपर्यंत हा देश ब्रिटिश साम्राज्याचाच एक भाग होता. १९५६ मध्ये पाकिस्तानने स्वतःचे संविधान स्वीकारले; तोपर्यंत तो ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. तर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानने बांगलादेश म्हणून स्वतःचे स्वातंत्र्य घोषित केले. [४]
Remove ads
ऐतिहासिक पार्श्वभूमी
पोर्तुगीज खलाशी वास्को- द- गामा हा इ.स.१४९८ साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला.[५] व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच, फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. सुरत येथे इ.स. १६१३ साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले. त्यांच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे. मोगलांची सत्ता १८ व्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला.[६] इ.स. १८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व भारतात प्रस्थापित केले होते.[७] त्या जोरावर १८ व्या शतकातही ब्रिटिशांनी भारतावर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले.

Remove ads
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

ब्रिटिशांच्या व्यापारामुळे आणि वसाहतवादी धोरणामुळे त्यांची भारतावर स्थापन झालेली सत्ता मोडून काढण्यासाठी इ.स. १८५७ साली भारतीयांनी उठाव केला.[८] इंग्रजानी भारतीय नागरिकांवर लादलेल्या प्रक्षोभक कायद्यामुळे भारतातील प्रजेचा असंतोष वाढत होता. रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी काही विशेष नावे या उठावाशी संबंधित आहेत.[९][१०] हा उठाव अयशस्वी ठरला असला तरी यांच्या झुंजार पराक्रमाने भारतीय इतिहासात मोलाची भर घातलेली आहे. या लढ्याच्या अपयशाची परिणती म्हणून ब्रिटिश राणीचा अंमल भारतावर सुरू झाला.[११]
Remove ads
बंगालची फाळणी आणि वंगभंग चळवळ
इ.स. १९०५ साली लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.[१२] पूर्व बंगाल आणि आसाम हे प्रांत एकत्र केले आणि दुसरीकडे पश्चिम बंगालची स्वतंत्र रचना केली. त्याच्या या कृत्यामुळे भारतीय नागरिक संतप्त झाले.[१३] रवींद्रनाथ टागोर यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला होता. या फाळणीच्या विरोधात भारतीयांनी १९०८ साली वंगभंग चळवळ सुरू केली.[१४]

देशभक्तांची चळवळ

- चळवळीच्या प्रेरणा देणारे नेतृत्व-
देशातील युवकांना विशेषतः देशभक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक व्यक्तीनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आणि आपल्या कार्यातून देशातील नागरिकांना आवाहन केले. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, रवींद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता, लाला लजपतराय, सय्यद अहमद खान, बंकिमचंद्र चॅटर्जी, दादाभाई नौरोजी यासारख्या अनेक व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. लाल-बाल-पाल ही त्रयी म्हणजे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल यांनी या सर्व क्रांतीकार्याची धुरा पेलली.[१५] लोकमान्य टिळक यांना मंडाले येथे झालेली राजद्रोहाच्या आरोपासाठी जन्मठेप,[१६] स्वातंत्र्यवीर सावरकर यांना झालेली अंदमानच्या काळ्या समुद्रावरील जन्मठेप या ऐतिहासिक घटना स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाच्या ठरल्या आहेत.भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेनुसार अवनींद्रनाथ ठाकूर यांनी क्रांतीकार्याला प्रेरक असे भारतमातेचे चित्र तयार केले. हे चित्र सर्वत्र प्रसारित करण्यात आले.

- मिठाचा सत्याग्रह-
ब्रिटिश सत्तेचा भारतावरील अंमल मोडून काढण्यासाठी भारतात पद्धतशीरपणे आणि नियोजनपूर्वक चळवळ आखली गेली. यांच्या धुरीणांनी समाजाला आवाहन केले आणि भारताचे नागरिक स्वतःच्या प्रेरणेने या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले हे याचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल.महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाने केला गेलेला दांडी येथील मिठाचा सत्याग्रह हा याचेच एक उदाहरण होय.[१७] गांधीजी हे लंडन येथून ब्यारीस्टर शिक्षण संपादन करून परत भारतात आले. त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वाला अनुसरून त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांना संघटित केले.[१८] मिठाचा सत्याग्रह किंवा ब्रिटिश राजवटीशी असहकार चळवळ या चळवळी त्यांच्या नेतृत्वाने झाल्या. स्वातंत्र्य प्राप्त करण्यात अशा चळवळींना थेट यश आले नसले तरी त्यामुळे देशातील नागरिकांत स्वातंत्र्याची जाणीव वाढविण्यात अशा चळवळींचे योगदान महत्त्वाचे ठरले.
- स्वदेशी चळवळ-
परदेशी मालावर भारतीयांनी बंदी घातली आणि स्वदेशी मालाचा पुरस्कार करण्याचे भारतीय नागरिकांना आवाहन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केल्याची घटना इतिहासात महत्त्वाची मानली जाते. लोकमान्य टिळक यांनी स्वदेशीचे व्रत घेण्याचे लोकांना आवाहन केले. भारतीय उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.[१९] याद्वारे ब्रिटिशांच्या जुलूमाला विरोध करण्याचे शिकस्तीचे प्रयत्न करून भारतीयांनी आपला असंतोष व्यक्त केला. या चळवळीने संपूर्ण भारतातील क्रांतीकार्याला जोर चढला.[२०] स्वराज्य, स्वभाषा, स्वदेशी या सूत्रांनी भारतीय नागरिकांत प्रेरणा जागी ठेवण्याचे कार्य या चळवळींनी केले.[२१]
- असहकार चळवळ-
ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या सरकारी संस्था, न्यायालये यावर बहिष्कार घालणे,कर न भरणे,शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार घालणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून भारतीयांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आपला विरोध दर्शविला.[२२]
Remove ads
अन्य नोंद घेण्याजोगी क्रांतीकार्ये

- डिसेंबर १९०९ मध्ये अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा केलेला वध[२३]
- १९२९ मध्ये भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत केलेला बॉम्बहल्ला आणि या तिघांना मिळालेली फाशीची शिक्षा[२४]
- आझाद हिंद सेना- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून फॉरवर्ड ब्लॉक नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ब्रिटिशांशी लढण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.[२५]
महायुद्धे
पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या प्रभावामुळे भारताने युद्धात सर्वतोपरी सहाय्य दिले होते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही ब्रिटिश भारताला त्यात ओढू पाहत होते. तथापि सुभाषचंद्र बोस आणि अन्य काही भारतीय नेते यांना ते मान्य नव्हते.
भारताला स्वातंत्र्यप्राप्ती

इ.स.१९४२ साली तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ब्रिटिशांकडे भारताच्या स्वातंत्र्याची जोरदार मागणी करायला सुरुवात केली. छोडो भारत असे या आंदोलनाचे नाव होते.[२६] यामध्ये संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणावर उत्सफूरतपणे लोकांनी सहभाग नोंदविला.[२७] भारतीयांचा संघर्ष ब्रिटिश सत्ता दडपून शकली नाही आणि क्रांतीकारकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे दिसू लागली. गव्हर्नर[२८] माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच १५ ऑगस्ट १९४७ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले.
Remove ads
चित्रदालन
- तात्या टोपे
- झाशीशी राणी लक्ष्मीबाई
- बाळ गंगाधर टिळक
- दांडीचा मिठाचा सत्याग्रह
- विनायक दामोदर सावरकर
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads