लंडन
इंग्लंडचे व युनायटेड किंग्डमचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर तसेच युरोपियन संघामधील सर्वात मोठे From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
लंडन (इंग्लिश: London ) हे इंग्लंडचे व युनायटेड किंग्डमचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर तसेच युरोपियन संघामधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या ह्या शहराला २,००० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे.
लंडन हे अर्थ, कला आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये जगातील एक प्रमुख शहर आहे. न्यू यॉर्क शहर व टोकियोसोबत लंडन हे जगातील सर्वात शक्तिशाली आर्थिक केंद्र मानले जाते.[१][२][३]. तसेच युरोपातील सर्वात मोठे अर्थव्यवस्था असलेले शहर हा मान देखील लंडनकडेच जातो.[४] जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक लंडनमध्ये येतात[५] तसेच लंडन हीथ्रो विमानतळ हा आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीसाठी जगातील सर्वात मोठा विमानतळ आहे.[६]. २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धा लंडनमध्ये भरवल्या गेल्या. ह्या स्पर्धांचे तिसऱ्यांदा आयोजन करणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे.
जुलै २०१० मध्ये ७८,२५,२०० इतकी लोकसंख्या असलेले लंडन युरोपामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते.[७] ग्रेटर लंडनची लोकसंख्या ८२,७८,२५१ तर लंडन महानगर क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे १.२ ते १.४ कोटी आहे.[८] लंडन शहराच्या समाजरचनेत कमालीचे वैविध्य आढळते. लंडन परिसरात ३०० भाषा बोलल्या जातात. सध्या लंडन परिसरात राहणारे ६.६ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत.
Remove ads
नावाची व्युत्पत्ती
लंडन हे नाव इ.स.च्या पहिल्या शतकापासून वापरात आहे. या सुमारास हे नाव लंडनियम असे लॅटिनीकृत केले जात असे.[९] इतर भाषांमध्ये हे लुंडेन (जुने इंग्लिश), लुंडैन (वेल्श) किंवा लंडन्योन (केल्टिक) असे वापरले जात असे. य केल्टिक नावाचे इंग्लिश आणि लॅटिनमध्ये लंडन असे रुपांतरण झाले.[१०]
१८८९पर्यंत फक्त लंडन शहराला लंडन असे संबोधले जात असे. त्यानंतर लंडन काउंटी तसेच बृहद् लंडन परिसराला लंडन नावाने ओळखतात.[११]
Remove ads
इतिहास
प्रागैतिहासिक
थेम्स नदीवरील वॉक्सहॉल पूलाजवळच्या भागात सापडलेल्या एका प्राचीन पूलाच्या अवशेषांच्या कार्बन-डेटिंग[मराठी शब्द सुचवा]नुसार इस.पू. १७५०-१२८५ दरम्यानचे असल्याचे सिद्ध झाले आहे.[१२] येथून जवळच एका लाकडी इमारतीच्या पायाचे अवशेष इ.स.पू. ४८००-४५०० च्या सुमारास असल्याचे आढळले आहे.[१३] ही दोन्ही ठिकाणे पूर्वीच्या रिव्हर एफ्रा या नदीच्या थेम्सशी होणाऱ्या संगमाजवळ आहेत.[१४]
रोमन लंडन
लंडन शहर आता असलेल्या ठिकाणी ज्ञात इतिहासातील पहिली वसाहत इ.स. ४७च्या सुमारास होती. इ.स. ४३मध्ये रोमन साम्राज्याने या प्रदेशावर आक्रमण करून येथे ठाण मांडले व चार वर्षांत ही वस्ती उभी केली.[१५] याला लंडनियम असे नाव होते. इ.स. ६१मध्ये स्थानिक इसेनी जमातीने आपल्या राणी बूडिकाच्या नेतृत्त्वाखाली यावर हल्ला केला व लंडनियम बेचिराख केले.[१६]
कालांतराने येथे पुन्हा वस्ती झाली व इ.स. १०० च्या सुमारास जवळच्या कोल्चेस्टर शहरापेक्षा त्याला अधिक महत्व मिळाले. रोमन ब्रिटनमधील हे मुख्य शहर होते. दुसऱ्या शतकाच्या सुमारास येथे अंदाजे ६०,००० लोकांची वस्ती होती.[१७]
अँग्लो-सॅक्सन आणि व्हायकिंग काळ
पाचव्या शतकात रोमन साम्राज्याचा अस्त झाल्यावर लंडनियम शहर भकास झाले होते. जवळच्या सेंट-मार्टिन-इन-द-फील्ड्सच्या आसपास रोमन व रोमन-प्रभावित वस्ती इ.स. ४५० पर्यंत तग धरून होती.[१८] सहाव्या शतकाच्या सुरुवातीस लंडनियमच्या थोडेसे पश्चिमेस लुंडनेविच हे अँग्लो-सॅक्सन शहर उभे राहिले.[१९] इ.स. ६८० पर्यंत हे पुन्हा एकदा ब्रिटनमधील प्रमुख शहर झाले होते. नवव्या शतकात व्हायकिंग टोळ्यांनी घातलेल्या धाडींमुळे शहर पुन्हा एकदा मोडकळीस आले. यांपैकी ८५१ आणि ८८६ सालच्या धाडींमध्ये लंडनचा धुव्वा उडाला तर ९९४ची धाड परतवून लावण्यात स्थानिकांना यश मिळाले.[२०]
व्हायकिंग लोकांनी पूर्व आणि उत्तर इंग्लंडमध्ये आपली सत्ता स्थापली तेव्हा लंडन त्याच्या पश्चिम सीमेवर होते. वेस्ट सॅक्सन राजा आल्फ्रेड द ग्रेट आणि डेनिश सरदार गुथ्रुम यांच्यातील ८८६च्या तहानुसार येथून चेस्टर पर्यंतची रेघ इंग्लंड आणि व्हायकिंग राज्यांमधील सीमा होती. अँग्लो-सॅक्सन क्रॉनिकल या ग्रंथानुसार आल्फ्रेडने लंडनची पुनर्स्थापना केली. त्यावेळी लुंडनेविच शहर सोडून देउन वस्ती पुन्हा जुन्या रोमन लंडनच्या परिसरात आली. येथील रोमन तटबंदीच्या आत त्यांनी आपले व्यापार-उदीम स्थापले. यानंतर लंडनचा विकास मंदगतीने होत होता परंतु ९५०च्या सुमारास विकासाची गती एकदम वाढली.[२१]
११व्या शतकात लंडन हे विकसित, मोठे देशाच्या राजधानीच्या दर्जाचे शहर झालेले होते.[२२]
मध्ययुगीन लंडन

१०६६मध्ये हेस्टिंग्सची लढाई जिंकल्यावर नॉर्मंडीचा ड्यूक विल्यम इंग्लंडचा राजा झाला. २५ डिसेंबर, १०६६ रोजी त्याचा राज्याभिषेक नव्याने बांधलेल्या वेस्टमिन्स्टर अॅबीमध्ये झाला.[२३] विल्यमने टॉवर ऑफ लंडन हा दगडी बुरुज बांधला. शहरावर नजर आणि जनतेवर धाक ठेवण्यासाठी त्याने असे अनेक बुरुज बांधले होते..[२४] १०९७मध्ये दुसऱ्या विल्यमने वेस्टमिन्स्टर हॉल बांधायला सुरुवात केली. याचे पुढे वेस्टमिन्स्टर पॅलॅस या महालात झाले.[२५]
१२व्या शतकापर्यंत इंग्लंडचे प्रशासन तेथील राजा जेथे असेल तेथे जाउन राहत असे. साधारण या सुमारास या प्रशासनाचा आवाका आणि महत्व वाढले आणि अनेक प्रशासकीय संस्था आणि अधिकारी वेस्टमिन्स्टरमध्ये स्थायिक झाले. शाही खजिना येथून जवळ असलेल्या टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवण्यात आला. वेस्टमिन्स्टर आता सरकारी मुख्यालय असले तरी लंडन देशातील सगळ्यात मोठे शहर आणि आर्थिक व्यवहारांचे मुख्य केन्द्र होते. लंडनने आपले स्वतःचे शहरी प्रशासन स्थापन केले. इ.स. ११००मध्ये लंडनची लोकसंख्या १८,००० होती आणि १३०० सालापर्यंत ही संख्या १,००,००० पर्यंत पोचली.[२६] चौदाव्या शतकातील काळ्या प्लेगच्या साथीमध्ये लंडनची एक तृतियांश वस्ती मृत्युमुखी पडली.[२७] १३८१ साली शेतकऱ्यांच्या उठाव लंडनमध्ये झाला.[२८]
नॉर्मन वंशाची सत्ता स्थापन झाल्यानंतर इग्लंडमध्ये ज्यू लोकांनी मोठ्या प्रमाणात वस्ती करणे सुरू केले होते व लंडनमध्ये त्यांची लोकसंख्या लक्षणीय होती. ११९०मध्ये राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी दरबारात आल्यानंतर त्यांचे शिरकाण करण्याचा आदेश राजाने दिल्याची आवई उठल्यानंतर लंडनमध्ये ज्यूविरोधी दंगल उसळली.[२९] दुसऱ्या बॅरन युद्धादरम्यान १२६४ साली सिमॉन दे माँतफोर्टच्या सैनिकांनी ज्यूंकडून देणेकऱ्यांचा हिशोब मागताना ५०० पेक्षा अधिक ज्यूंना ठार मारले होते.[३०] १२९० साली पहिल्या एडवर्डने त्यांना इंग्लंडमधून हाकलून देण्याचे फरमान काढले. त्यानंतर सुद्धा ज्यू इंग्लंडमध्ये तग धरून होते.
पंधरावे-अठरावे शतक
ट्युडोर काळात चर्चच्या हातात असलेल्या जमीनी व इमारती हळूहळू खाजगी लोकांकडे गेल्यावर व्यापार-उद्यमांना वेग मिळाला..[३१] लंडनमधून लोकरीचे कपडे रेल्वेमार्गे आणि समुद्रमार्गे नेदरलँड्स, बेल्जियम व आसपासच्या प्रदेशांत पाठविले जात असत.[३२] या काळात इंग्लंडचा समुद्री व्यापार वायव्य युरोपपुरता मर्यादित होता. इटली आणि भूमध्य समुद्राकडे जाणारा माल सहसा अँटवर्पमार्गे आल्प्स पर्वत ओलांडून जात असे. १५६५मध्ये इंग्लिश व्यापाऱ्यांना नेदरलँड्समध्ये व्यापार करण्याची परवानगी मिळाल्यावर त्यांचा धंदा फोफावला.[३३] याच वेळी रॉयल एक्सचेंजची स्थापना करण्यात आली.[३४] यातूनच ईस्ट इंडिया कंपनीसारख्या कंपन्या स्थापल्या गेल्या. या सुमारास लंडन उत्तर समुद्रावरील मुख्य बंदर होत व इंग्लंड आणि युरोपातून लोक येथे स्थलांतरित होत होते. १५३०मध्ये ५०,००० वस्ती असलेले लंडन १६०५मध्ये २,२५,००० लोकांचे शहर झाले.[३१] या काळातच ५ नोव्हेंबर १६०५ रोजी पहिल्या जेम्स वर खूनी हल्ला झाला होता.[३५]
सोळाव्या शतकात विल्यम शेक्सपियर आणि त्याचे समकालीन लंडनमध्ये राहत होते. शेक्सपियरचे ग्लोब थियेटर १५९९मध्ये साउथवार्क या उपनगरात बांधले गेले. पुराणमतवादी लोकांनी गोंधळ घातल्यावर लंडनमधील नाटकांचे प्रयोग १६४२ मध्ये पूर्णपणे थांबले.[३६] १६६०मध्ये नाटकांवरील बंदी काढली गेली आणि पुन्हा एकदा नाट्यभूमीवर प्रयोग होऊ लागले. १६६३मध्ये थियेटर रॉयल हे लंडनमधील सगळ्यात जुने आणि अजूनही सुरू असलेले नाट्यगृह वेस्ट एंड भागात उघडले.[३७]

१६३७ मध्ये पहिल्या चार्ल्सने लंडन परिसरातील प्रशासनात सुधारणा करण्यासाठी शहराच्या सीमा वाढवून आसपासची गावे शहराच्या प्रशासनाखाली आणण्याचा प्रयत्न केला. हे म्हणजे राजाकडून शहराच्या सत्तेवर मर्यादा आणून शहरातील सुविधा गावांना देण्याचा प्रयत्न शहरातील प्रशासकांना वाटला. त्यांना या गावांमधील लोकांचा शहराच्या प्रशासनात हस्तक्षेप नको होता. यामुळे त्यांनी या प्रस्तावाला साफ नकार दिला. द ग्रेट रिफ्युजल नावाने ओळखले जाणाऱ्या या ठरावाचा परिणाम म्हणून आजही लंडन शहराचे प्रशासन तऱ्हेवाइकपणे चालविले जाते.[३८]
इंग्लंडची संसद आणि राजा चार्ल्स दुसऱ्याच्या पाठीराख्य़ांमध्ये झालेल्या इंग्लंडच्या यादवी युद्धात बव्हंश लंडनवासी संसदेच्या बाजूने होते. १६४२मधील कॅव्हेलियर्सची फौज शहरावर चालून आली तेव्हा ब्रेंटफोर्ड आणि टर्नहॅम ग्रीनच्या लढायांमध्ये शहर कसेबसे वाचले. यानंतर शहराभोवती तटबंदी उभारली. लाइन्स ऑफ कम्युनिकेशन नावाची ही तटबंदी दोन महिन्यांच्या आत बांधून काढण्यात २०,००० लोकांचे हात होते.[३९] १६४७मध्ये न्यू मॉडेल आर्मी ही शाही फौज लंडनवर चालून आली तेव्हा या तटबंदीचा पहिल्यांदा वापर झाला पण काहीही उपयोग झाला नाही. न्यू मॉडेल आर्मी फारसा त्रास न होता शहरात शिरली.[४०] काही महिन्यांतच ही पाडून टाकण्यात आली.[४१]

१७व्या शतकात लंडनमध्ये अनेकदा प्लेगच्या साथी पसरल्या.[४२] १६६५-६६ च्या साथीत लंडनमधील पाचव्या भागाची वस्ती (सुमारे १,००,००० व्यक्ती) प्लेगला बळी पडल्या.[४२]
त्यानंतर लगेचच १६६६ साली पुडिंग लेन या गल्लीतून सुरू झालेली आग शहरभर पसरली आणि लाकडी इमारतींनी भरलेले शहराचे अनेक भाग जळून राख झाले.[४३] रॉबर्ट हूक या बहुविद्वानाच्या देखरेखीखाली शहराची पुनर्बांधणी होण्यासाठी दहा वर्षे लागली.[४४]
या आगीत भस्मसात झालेले सेंट पॉलचे कॅथेड्रल क्रिस्टोफर रेनने पुन्हा बांधले. युरोपमधील त्याकाळच्या भव्य आणि सुंदर इमारतींमध्ये गणना होणारी ही इमारत पुढे अनेक शतके लंडनच्या आकाशात प्रभावीपणे दिसत होते. या कॅथेड्रलचा उल्लेख विल्यम ब्लेकच्या कलाकृती आणि होली थर्सडे या कवितेतून दिसते.[४५]
जॉर्जियन राज्यकालात लंडनच्या पश्चिमेस मेफेर आणि इतर उपनगरे विकसित झाली. थेम्स नदीवर बांधलेल्या नवीन पुलांमुळे दक्षिण लंडनचाही विकास होत गेला. लंडनच्या बंदराला पूर्वेकडे नवीन धक्के बांधले गेले. अठराव्या शतकात लंडन हे जागतिक आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केन्द्र झाले.[४६]
अठराव्या शतकात लंडनमधील गुन्हेगारी चरमसीमेवर पोचल्याचे समजले जाते.,[४७] याला उपाय म्हणून १७५०मध्ये बाे स्ट्रीट रनर्स ही पोलिससंस्था उभारण्यात आली. १७२० आणि ३० च्या दशकांत लंडनमध्ये पुन्हा एकदा रोगांच्या साथी पसरल्या. या काळात जन्मलेल्या मुलांपैकी मोठा भाग ५ वर्षांच्या आतच मृत्युमुखी पडली[४८]
१७६२ साली तिसऱ्या जॉर्जने बकिंगहॅम राजवाडा विकत घेतला आणि पुढील ७५ वर्षे त्यात सुधारणा होत गेल्या.[४९]
मुद्रणयंत्राचे तंत्रज्ञान सोपे व स्वस्त झाल्यामुळे लंडनमधील साक्षरता वाढली आणि फ्लीट स्ट्रीट हा रस्ता ब्रिटिश पत्रकारितेचे केन्द्र झाला. नेपोलियनने अॅम्स्टरडॅमवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक आर्थिक संस्था आणि सावकारांनी तेथून लंडनला पलायन केले आणि लंडनला जागतिक अर्थकारणात अजूनच महत्व मिळाले.[५०] याच सुमारास रॉयल नेव्ही जगातील बलाढ्य आरमार व त्यामुळे इंग्लंडचा सागरी व्यापार अधिक सुरक्षित झाला.
अर्वाचीन
औद्योगिक क्रांतीमुळे लंडनसह ग्रेट ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले. लंडनमधील दुकाने व विक्रेत्यांच्या संख्येत शहराची वाढ दिसून येते.[५१][५२] यांत पॉल मॉल भागातील हार्डिग, हॉवेल अँड कंपनी हे जगातील पहिले डिपार्टमेट स्टोर[मराठी शब्द सुचवा] सुद्धा होते. १८३१ ते १९२५ दरम्यान लंडन जगातील सगळ्यात मोठे महानगर होते.[५३]
अत्यंत गिचमिडीच्या लंडन शहरात पुन्हा एकदा साथी पसरल्या. १८४८मध्ये कॉलेराच्या साधीत १४,००० तर १८६६मध्ये ६,००० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या.[५४] रस्त्यांवर होणाऱ्या वाहनांच्या गर्दीला उपाय म्हणून लंडन अंडरग्राउंडची रचना करण्यात आली. हे भुयारी रेल्वे जगातील पहिली अशी वाहतूक व्यवस्था होती.[५५]
२०व्या शतकाच्या सुरुवातीपासून लंडनमध्ये चहाची दुकाने लोकप्रिय होऊ लागली. जे. लायन्स अँड कंपनीने त्यांच्या साखळीतील पहिले चहाचे दुकान पिकॅडिली येथे १८९४मध्ये उघडले होते.[५६] ही दुकाने स्त्रीयांना मतदानहक्क मिळवून देण्यासाठीच्या चळवळीतील लोकांची भेटीचे ठिकाणे होती.[५७] या चळवळीला लक्ष्य करून लंडनमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बहल्ले झाले होते. यांत वेस्टमिन्स्टर अॅबी आणि सेंट पॉलच्या कॅथेड्रलचाही समावेश होते.[५८]
पहिल्या महायुद्धामध्ये लंडनवर जर्मनीने हवेतून बॉम्बफेक केली होती. दुसऱ्या महायुद्धातील लुफ्तवाफेने केलेल्या अशाच बॉम्बफेकीत लंडनचे अतोनात नुकसान झाले होते. शहरातील अनेक भागांमधील घरे व इतर इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि ३०,००० पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या.[५९]
दुसऱ्या महायुद्धातून सावरत असतानाच १९४८ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा लंडनमध्ये खेळल्या गेल्या. याचे मुख्य सोहळे आणि स्पर्धा जुन्या वेम्ब्ली स्टेडियममध्ये झाले होती.[६०] यानंतर २०१२ च्या स्पर्धाही येथे खेळल्या गेल्या. लंडन हे ऑलिंपिक स्पर्धांचे तीनदा यजमान असलेले पहिले शहर आहे.[६१]
१९४०पासून कॉमनवेल्थमधून अनेक लोकांनी लंडनला स्थलांतर केले. यांत जमैका, भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील लोक मोठ्या संख्येने होते.[६२] तरीसुद्धा दुसऱ्या महायुदानंतर लंडनची लोकसंख्या कमी झाली. १९३९मध्ये ८६ लाख वस्ती असलेल्या शहरात १९८० च्या दशकात सुमारे ६८ लाख व्यक्ती राहत होत्या.[६३] जानेवारी २०१५मध्ये महानगराची लोकसंख्या अंदाजे ८६.३ लाख होती.[६४]
१९५२मध्ये लंडनमध्ये पसरलेल्या प्रदूषित धुराचा परिणाम म्हणून क्लीन एर अॅक्ट १९५६ हा कायदा पारित झाला.[६५]
१९६० च्या दशकाच्या मध्यापासून लंडन जगातील तरुणाईचे केन्द्र झाले. किंग्स रोड, कार्नाबी स्ट्रीट आणि चेल्सी या भागांमध्ये स्विंगिंग लंडन संस्कृती पसरली.[६६] यातून पंक रॉक सारख्या संगीतप्रकारांचा उदय झाला.[६७]
उत्तर आयर्लंडमधील प्रादेशिक उठावाचा पडसाद लंडनध्येही उठला. १९७३मध्ये प्रोव्हिजनल आयरिश रिपब्लिकन आर्मीने लंडनमध्ये ओल्ड बेली बॉम्बस्फोट घडवून आणला. हे स्फोट पुढील दोन दशके सुरू होते..[६८] १९८१मध्ये लंडनच्या ब्रिक्सटन भागात वांशिक दंगली झाल्या होत्या[६९]
याच सुमारास लंडनमधील जलवाहतूक फेलिक्स्टोव आणि टिलबरी येथी हलल्यानंतर केनेरी व्हार्फचे रुपांतरण जागतिक आर्थिक केन्द्रात झाले.[७०] २००८मध्ये टाइम नियतकालिकाने लंडन, न्यू यॉर्क आणि हाँग काँग शहरांना जगातील सगळ्यात महत्वाची शहरे असल्याचे जाहीर केले व या शहरांचे नायलॉनकाँग असे नामाभिधान केले.[७१]
समुद्राच्या भरती-ओहोटीपासून शहराला धक्का लागू नये म्हणून थेम्स बॅरियर हा बंधारा बांधला गेला.[७२]
१९६५मध्ये लंडन शहराच्या सीमा विस्तारल्या आणि ग्रेटर लंडन काउन्सिलची रचना करण्यात आली.[७३] १९८६मध्ये ग्रेटर लंडन काउन्सिल ही लंडन महानगराची प्रशासकीय संस्था विसर्जित करण्यात आली आणि २००० पर्यंत ग्रेटर लंडन ऑथॉरिटीची स्थापना होई पर्यंत महानगराची देखभाल करणारी कोणतीच संस्था नव्हती. या काळात छोटी छोटी शहरे आपापले प्रशासन चालवित असत.[७४]
Remove ads
प्रशासन
नागरी प्रशासन

लंडनचे नागरी प्रशासन दोन स्तरांवर होते. ग्रेटर लंडन ऑथॉरिटी (जीएलए) संपूर्ण महानगराचे प्रशासन सांभाळते तर इतर ३३ छोट्या शासनसंस्था स्थानिक पातळीवरचे प्रशासन सांभाळतात.[७६] जीएलएमध्ये लंडन असेम्ब्ली ही निवडलेल्या प्रतिनिधींची सभा महापौरांवर देखरेख करते आणि त्यांचे निर्णय तसेच वार्षिक अर्थसंकल्प स्वीकारते किंवा नाकारते. जीएलए लंडनमधील वाहतूकीची देखरेख आपल्या टीएफएल या उपसंस्थेद्वारे करते. याशिवाय लंडनमधील पोलिस, अग्निशमन व्यवस्थेवरसुद्धा जीएलएचे प्रशासन आहे.[७७]
जीएलएचे मुख्यालय न्यूहॅम येथील नगरगृहात आहे. २०१६पासून सादिक खान हे लंडनचे महापौर आहेत.[७८][७९]
लंडन शहर ३२ बरो आणि सिटी ऑफ लंडन अशा ३ प्रशासकीय विभागांमध्ये विभागलेले आहे.[८०] प्रत्येक बरोमध्ये साधारणतः १.५ ते ४ लाख व्यक्ती राहतात. प्रत्येक बरोमध्ये स्थानिक प्रशासन असते.[८१] तेथील शाळा, पुस्तकालये, सार्वजनिक उद्याने, छोटे रस्ते, कचरा व्यवस्थापन, इ. सेवा हे बरो पुरवतात. काही सेवा अनेक बरो मिळून पुरवतात.[८२]
या बरोंचा वार्षिक अर्थसंकल्प सुमारे २२ अब्ज पाउंड (२,२७,६०० कोटी रुपये) इतका तर जीएलएचा अर्थसंकल्प ७.५ अब्ज (८१,००० कोटी रुपये) इतका असतो.[८३]
पोलिस आणि सुव्यवस्था
बृहद् लंडन शहरातील पोलिसदलाला मेट्रोपोलिटन पोलिस किंवा द मेट म्हणतात. या दलाचे मुख्यालय पूर्वी व्हाइटहॉलमधील ग्रेट स्कॉटलंड यार्ड या रस्त्यावर असल्याने या पोलिसदलाला स्कॉटलंड यार्ड नावानेही ओळखतात. हे दल लंडनच्या महापौरांच्या अखत्यारीत येते.[८४] या पोलिसांचे कस्टोडियन हेलमेट हे शिरस्त्राण जगप्रसिद्ध आहे. ह सगळ्यात आधी १८६३मध्ये वापरले गेले होते. याला सांस्कृतिक मानचिह्न आणि ब्रिटिश कायदेरक्षकांचे चिह्न असे म्हणले गेले आहे.[८५] हे पोलिस पूर्वी विशिष्ट निळ्या रंगाच्या आश्रयस्थानाखाली उभे राहत असत..[८६]
लंडन शहराचे स्वतःचे सिटी ऑफ लंडन पोलिस नावाचे दल आहे.[८७]
लंडन अग्निशमन सेवा ही लंडन फायर अँड इमर्जन्सी प्लानिंग ऑथॉरिटीच्या अधिकारात आहे. ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अग्निशमनसेवा आहे.[८८] राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या रुग्णवाहिका लंडन अँब्युलन्स सर्व्हिस ही संस्था पुरवते. ही जगातील सेवास्थळी मोफत असणारी सगळ्यात मोठी सेवा आहे.[८९] रॉयल नॅशनल लाइफबोट इन्स्टिट्युशन ही संस्था थेम्स नदीवर तर लंडन एर अँब्युलन्स हवाई रुग्णवहन सेवा पुरवतात.[९०]
ब्रिटिश वाहतूक पोलिस शहरातून धावणाऱ्या नॅशनल रेल, लंडन अंडरग्राउंड, डॉकलँड लाइट रेल्वेझ आणि ट्रॅमलिंक या मार्गांवरील सुरक्षेची जबाबदारी निभावतात.[९१] संरक्षण मंत्रालय पोलिस हे विशेष दल सहसा सार्वजनिक कायदेरक्षणात भाग घेत नाही.[९२]

एमआय६ या हेरसंस्थेचे मुख्यालय लंडनमध्ये थेम्स नदीच्या उत्तर काठावर तर आणि एमआय५ या प्रतिहेरसंस्थेचे मुख्यालय दक्षिण काठावर आहेत.[९३]
लंडनमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण विभागानुसार बदलते.[९४] २०१५मध्ये महानगरात ११८ खून झाले होते. २०१४ च्या प्रमाणात हे २५% जास्त होते.[९५] एकूण लंडनमध्ये गंभीर गुन्हे वाढत आहेत. इतर कारणांबरोबरच पोलिसदलांना अर्थसंकल्पातून मिळणारा निधी कमी होत चालल्याने हे होते आहे[९६]
युनायटेड किंग्डमची राजधानी

लंडन हे युनायटेड किंग्डमची राजधानी आहे. येथे व्हाइटहॉलच्या आसपास अनेक मंत्रालये तसेच युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आहेत.[९७]
इंग्लंडच्या संसदेमध्ये लंडन महानगरातून ७३ खासदार निवडून जातात. २०१९ च्या निवडणुकांमध्ये यांतील ४९ मजूर पक्ष, २१ हुजूर पक्ष आणि ३ लिबरल डेमॉक्रॅट पक्षाचे खासदार निवडून गेले.[९८] २०२४ च्या निवडणुकांमध्ये मजूर पक्षाने मोठा विजय मिळवला. युनायटेड किंग्डमच्या सरकारमध्ये १९९४पासून लंडनमंत्री हे वेगळे पद आहे. २०२०मध्ये पॉल स्कली या पदावर होते.[९९]
Remove ads
भूगोल

बृहद् लंडन परिसराची लोकसंख्या ७१,७२,०३६ (२००१) इतकी होती आणि विस्तार ६११ चौरस मैल (१,५८३ चौ. किमी) आहे. लंडन महानगरक्षेत्राची लोकसंख्या १,३७,०९,००० आणि विस्तार ३,२३६ चौरस मैल (८,३८२ चौ. किमी) इतका होता.[१००]
लंडन शहर थेम्स नदीच्या दोन्ही काठांवर पसरलेले आहे. या नदीतून जलवाहतूक होते व लहान जहाजे समुद्रापासून येथपर्यंत येऊ शकतात. पोर्ट ऑफ लंडन हे येथील बंदर आहे. येथून प्रवासी व मालवाहतूक होते. एकेकाळी थेम्स नदीचे पात्र आत्ता आहे त्यापेक्षा सुमारे पाचपट रुंद होते.[१०१] थेम्स नदीवर समुद्राच्या भरती-ओहोटीचा थेट परिणाम होतो व त्यामुळे शहराला पूराचा धोका आहे.[१०२] जागतिक हवामानबदल आणि भूशास्त्रीय बदलांमुळे हा धोका अधिकाधिक वाढतो आहे.[१०३] व्हिक्टोरियन काळापासून थेम्सचे दोन्ही काठ बांधून काढले गेले आहेत व याच्या उपनद्यांना भुयारातून मार्ग दिलेला आहे.
शहर जसजसे वाढत गेले तसे आसपासची लहान गावे व वस्त्या यात समाविष्ट झाल्या. अशा गाव व वस्त्यांची नावे अद्यापही प्रचलित आहेत. मेफेर, वेम्बली, साउथवार्क, इ. यांपैकी काही प्रमुख भाग आहेत.
Remove ads
हवामान
लंडनमधील हवामान इतर पश्चिम युरोपीय शहरांप्रमाणे सौम्य व आर्द्र आहे.[१०४] २०१० साली लंडन हे युरोपातील सर्वात प्रदुषित शहर होते.[१०५]
Remove ads
अर्थकारण

लंडन शहराचे अर्थकारण २०१९ साली अंदाजे ५०३ अब्ज पाउंड (५३,३२,८०० कोटी रुपये इतके होती. एकूण युनायटेड किंग्डमच्या अर्थकारणातील चौथा भाग फक्त लंडनमध्ये होता.[१०९]
लंडनमध्ये आर्थिक व्यवहार करणारे पाच प्रमुख भाग आहेत -- वेस्टमिन्स्टर, केनेरी व्हार्फ, कॅम्डेन आणि इस्लिंग्टन तसेच लँबेथ आणि साउथवार्क. बृहद् लंडमधील इमारतींमधून २ कोटी २७ लाख मी२ इतकी जागा कार्यालयांनी व्यापली आहे. लंडन शहरातील जागांच्या किमती जगातील सर्वाधिक महागड्या शहरांपैकी आहेत.[११०]
लंडनमधील अर्थ आणि वित्तसेवा यूकेमध्ये प्रचंड प्रमाणात परदेशी चलन आणतात. जगातील चलन उलाढालींपैकी सुमारे ३७% भाग (५०,००,०० कोटी रुपये) या शहरातून होतात.[१११] लंडन शहरात काम करणाऱ्यांपैक ८५% कर्मचारी अर्थ, वित्त किंवा संबंधित सेवाशील कंपन्यामध्ये आहेत. ब्रेक्झिटनंतर युरोपीय कंपन्यांनी लंडन शेर बाजारातून नाव काढून घेतले असले तरीही या सेवांचा प्रभाव अद्यापही आहे.[११२] बँक ऑफ इंग्लंड, लंडन शेर बाजार आणि लॉइड्स ऑफ लंडन ही विमा कंपनी लंडनमध्ये स्थित आहेत.[११३]
फूट्सी १०० या लंडन शेर बाजाराचा निर्देशांकातील ५० पेक्षा अधिक कंपन्याची तसेच युरोपमधील ५०० सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकीक १०० पेक्षा अधिक कंपन्यांची मुख्यालये लंडन शहरात आहेत..[११४]
अर्थ आणि वित्तव्यापारावरील मोठी भिस्त असल्याने २००७-०८ च्या आर्थिक संकटाचा लंडनवर भीषण परिणाम झाला होता.[११५]
Remove ads
वस्तीविभागणी

लंडन महानगरक्षेत्र बृहद् लंडनच्या पलीकडे पसरलेले आहे. येथील एकूण लोकसंख्या २०११मध्ये ९७,८७,४२६ इतकी होती.[११७] चिकटून असलेल्या शहरांसह येथील लोकसंख्या १.२-१.४ कोटी आहे[११८] १९९१-२००१ दरम्यान ७,२६,००० लोकांनी येथे स्थलांतर केले होते.[११९]
लोकसंख्येनुसार लंडन १९व्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे शहर आहे.[१२०] जगातील अतिशय दाट वस्ती असलेले ५,१७७ inhabitants per square kilometre (१३,४१० /sq mi)[१००] हे शहर १,५७९ चौरस किमी (६१० चौ. मैल) मध्ये विस्तारलेले आहे. ब्रिटनमधील इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा येथील वस्तीची दाटी १०पट किंवा अधिक आहे.[१२१]
लंडनमधील २३.१% लोक सरकारी फ्लॅटमधून भाड्याने राहतात तर ३०% लोक खाजगी घरमालकांकडून घर किंवा फ्लॅट भाड्याने घेतात. ४६.८% लोक स्वतःच्या घरात राहतात.[१२२]
शहरातील ४६.७% लोक पदवीधर आहेत तर १६.२% जेमतेम लिहू-वाचू शकतात.[१२३] लंडनमधील ४२.९% लोक घरून काम करतात तर २०.६% लोक कार घेउन कामास जातात. ९.६% लोक रेल्वे किंवा अंडरग्राउंडने कामाला जातात. २०११मध्ये ही संख्या २२.६% होती.[१२४]
जानेवारी २००५ च्या सर्वेक्षणानुसार लंडनमध्ये सुमारे ३०० वेगवेगळ्या भाषा आणि बोलीभाषा वापरल्या जात होत्या.[१२५] २०२१ च्या जनगणनेनुसार ७६.४% लोकांची मातृभाषा इंग्लिश होती. रोमेनियन, स्पॅनिश, पोलिश, बंगाली आणि पोर्तुगीझ या इतर बहुल प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या भाषा होत्या[१२६]
वय
२०१८मध्ये लंडनमधील लोकांचे सरासरी वय ३६.५ वर्षे होते. यूकेमध्ये हे वय ४०.३ वर्षे आहे.[१२७] बृहद् लंडनमध्ये १४ वर्षांखालील मुले एकूण वस्तीच्या २०.६% आहेत तर खुद्द शहरात हे प्रमाण १८% आहे. हेच आकडे १४-२४ वर्षांसाठी ११.१% आणि १०.२%, २५-४४ साठी ३०.६% आणि ३९.७%, ४५-६४ साठी २४% आणि २०.४% तर ६५+ वर्षाकरता १३.६% आणि ९.३% आहेत.[१२७]
२०२१ च्या जनगणनेनुसार लंडनमधील ३५,७५,७३९ म्हणजेत ४०.६% व्यक्ती युनायटेड किंग्डमबाहेर जन्मल्या होत्या.[१२८] १९७१ च्या तुलनेने ही संख्या २९ लाखांनी जास्त आहे. त्यावेळी फ्त ६,६८,३७३ व्यक्ती परदेशांत जन्मलेल्या होत्या.[१२९] २०२१मध्ये यांपैकी ३२.१% लोक आशियामध्ये (लंडनच्या एकूण लोकसंख्येपैकी १३%), १७.७% (७१%) आफ्रिकेत १५.५% (38.2ज्%) युरोप तर ४.२% लोक अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये जन्मलेल्या होत्या.[१३०] एकूण परदेशां जन्मलेल्यांपैकी सर्वाधिक लोक भारत, रोमेनिया, पोलंड, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या होत्या[१३०]
वांशिक
२०२१ च्या जनगणनेनुसार लंडनमधील ५३.८% किंवा ८१,७३,९४१ व्यक्ती श्वेतवर्णीय होत्या. यांपैकी ३६.८% ब्रिटिश, १.८ आयरिश आणि उरलेले इतर ठिकाणचे होते..[१३१] लंडनमधील २०.८% व्यक्ती पूर्ण आशियाई आणि अधिक १.४% लोक मिश्र-आशियाई वंशाचे होते. ब्रिटिश भारतीय लोकांची संख्या ७.५% किंवा दर १२ पैकी १ इतकी होती तर ब्रिटिश-पाकिस्तानी ३.७% आणि ब्रिटिश-बांगलादेशी ३.३% होते. ब्रिटिश-चिनी १.७%, ब्रिटिश-अरब १.६% आणि इतर आशियाई लोक ४.६% होते.[१३१]
२०२१मध्ये लंडनमधील १५.९% कृष्णवर्णीय किंवा मिश्र-कृष्णवर्णीय होत्या. यांपैकी आफ्रिकेतील लोक लंडनमधील एकूण लोकसंख्येच्या ७.९% होते आणि ३.९% लोक कॅरिबियनमधील होते.[१३१]
लंडनच्या वस्तीचे मिश्रण १९६० नंतर बदलले आहे. १९६१मध्ये अश्वेतवर्णीयांचे प्रमाण फक्त २.३% किंवा १,७९,१०९ इतके होते.[१३२][१३३] १९९१मध्ये हे प्रमाण २०.२% किंवा १३,४५,११९ झाले.[१३४] २०२१मध्ये हेच प्रमाण ४६.२% झाले.[१३५]
धर्म
२०२१मध्ये लंडनमध्ये बव्हंश (४०.६६%) ख्रिश्चन लोक होते आणि २०.७% लोक निधर्मी होती. १५% मुस्लिम होते आणि ८.५% लोकांनी त्यांचा धर्म कळवला नाही. लंडनमध्ये ५.१५% लोक हिंदू तर १.६५% ज्यू आणि १.६४% शीख आणि १% बौद्ध लोक होते.[१३६][१३७]
शहराच्या वायव्य भागातील हॅरो आणि ब्रेंट या बरोंमध्ये हिंदूंची मोठी वस्ती आहे. लंडनमध्ये बॅप्स श्री स्वामिनारायण मंदिर सह ४४ देउळे आहेत. ब्रेंटमध्ये नीस्डेन टेंपल हे मोठे देउळ आहे.[१३८][१३९]
साउथऑल भागात भारताबाहेरचा सगळ्यात मोठा गुरुद्वारा आहे.[१४०]
Remove ads
वाहतूक व्यवस्था
लंडन शहर इंग्लंड व जगातील इतर शहरांसोबत विमानसेवा, रेल्वे व रस्तेमार्गांनी जोडले गेले आहे.
रेल्वे आणि भुयारी रेल्वे
लंडन अंडरग्राउंड आणि डीएलआर

शहरी वाहतुकीसाठी लंडन अंडरग्राऊंड ही जगातील सर्वात जुनी व दुसरी सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे सेवा कार्यरत आहे. २८० स्थानके जोडणाऱ्या ह्या रेल्वेचा वापर दररोज ३० लाख प्रवासी करतात. जगातील सर्वोत्तम शहरी वाहतूक असलेले शहर हा खिताब लंडनला मिळाला आहे.[१४१]
उपनगरी सेवा
लंडन उपनगरीय रेल्वे शहराजवळच्या उपनगरांना एकमेकांशी तसेच मुख्य शहराशी जोडते. या सेवेवर एकूण ३६८ स्थानके आहेत.
लांब पल्ल्याची आणि आंतरराष्ट्रीय सेवा
युरोस्टार ही चॅनल टनेलमधून धावणारी द्रुतगती रेल्वेसेवा लंडनला पॅरिस व ब्रुसेल्स शहरांशी जोडते. लंडन शहरात लांब पल्ल्याची गाड्यांची एकूण १८ रेल्वे स्थानके आहेत. येथून ग्रेट ब्रिटनमधील सर्व शहरे जोडलेली आहेत.
रस्ते आणि महामार्ग
लंडनमधील बव्हंश वाहतूक सार्वजनिक प्रवासीसेवेवर होते तर उपनगरांमध्ये कारने प्रवास सर्रास होतो. लंडन शहराभोवती ४ वेगवेगळे वर्तुळाकार मार्ग आहेत - इनर रिंग रोड, नॉर्थ आणि साउथ सर्क्युलर रोड तसेच एम२५. या रस्त्यांना छेद देणारे थेट रस्ते शहराच्या मध्याकडे जातात. तरीही अगदी शहरमध्यात जाणारे रस्ते अभावानेच आहेत. ११७ मैल (१८८ किमी) लांबीचा एम२५ हा युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा वर्तुळाकार महामार्ग आहे.[१४२] ए१ रस्ता मोटरवे लंडनला लीड्स तर एम१ मोटरवे न्यूकॅसल अपॉन टाइन मार्गे एडिनबराला जोडतो.[१४३]

लंडनमध्ये टॅक्सीसेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. काळ्या रंगाच्या या गाड्या लंडनच्या कानाकोपऱ्यातून दिसतात. बीबीसीनुसार काळ्या कॅब आणि लाल दुमजली बस आणि त्यांच्याबद्दलच्या अनेक कथा लंडनमधील परंपरांमध्ये खोलपणे निगडीत आहेत.[१४४] ऑस्टिन मोटर कंपनीने हॅकनी कॅरेज १९२९पासून बनविणे सुरू केले. १९४८मध्ये ऑस्टिन एफएक्स३ आणि १९५८मध्ये ऑस्टिन एफएक्स४ तर अलीकडे लंडन टॅक्सीज इंटरनॅशनल कंपनीचे टीएक्स२ आणि टीएक्स४ हे प्रकार रस्त्यावर दिसतात. या गाड्या सहसा काळ्या रंगाच्या असतात तर काहींवर इतर रंगाच्या किंवा जाहिराती असतात.[१४५]
लंडनमधील वाहतूकीची कोंडी कुप्रसिद्ध आहे. २००९मध्ये गर्दीच्या वेळी शहरातून जाणाऱ्या कारचा सरासरी वेग फक्त १७.१ किमी/तास (१०.६ मैल/तास) इतका होता.[१४६] २००३ पासून शहरमध्यात जाणाऱ्या खाजगी गाड्यांकडून कोंडी टोल घेतला जातो.[१४७] शहरमध्यात राहणाऱ्यांना यात मोठी सवलत असते.[१४८] काही वर्षांमध्ये शनि-रविवार सोडून शहरमध्यात जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत १,९५,००० वरून १,२५,००० इतकी कमी झाली[१४९]
लंडनच्या बससेवेत ९,३०० वाहने आहेत आणि ही सेवा २४ तास उपलब्ध असते. ही सेवा ६७५ मार्गांवरील १९,००० बसथांब्यांवर उपलब्ध आहे.[१५०] २०१९मध्ये लंडनच्या बसमधून २ अब्ज लोकांनी प्रवास केला होता.[१५१] २०१०पासून या सेवेने सरासरी वार्षिक १.२ अब्ज पाउंड (१०८ अब्ज रुपये) कमावले आहेत.[१५२]

लंडनची दुमजली (डबल-डेकर) बस ही शहराचे ओळख आहे. १९४७मध्ये पहिल्यांदा एईसी रीजंट ३ आरटी प्रकारच्या या बसेस धावल्या. त्यानंतर एईसी रूटमास्टर हा प्रकार वापरला गेला.[१५३]
व्हिक्टोरिया कोच स्टेशन लंडनला ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसचे मुख्य स्थानक आहे. १९३२मध्ये सुरू झालेल्या या स्थानकाचे १९७०मध्ये राष्ट्रीयीकरण झाले आणि नंतर ते लंडन ट्रान्सपोर्टने (आताचे ट्रान्सपोर्ट फॉर लंडन) सरकारकडून विकत घेतले. येथून दर वर्षी १ कोटी ४० लाख प्रवासी यूके आणि युरोपमधील अनेक शहरांना ये-जा करतात.[१५४]
विमानवाहतूक
लंडन महानगराला सहा विमानतळ सेवा पुरवतात. हा विमानतळ महानगराच्या चार कोपऱ्यांमध्ये प्रत्येकी एक, शहरमध्याजवळ एक आणि पश्चिमेस मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ असे पसरलेले आहेत.
- हिलिंग्डन ह्या बरोमध्ये स्थित असलेला लंडन हीथ्रो विमानतळ हा युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठा व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.
- गॅटविक विमानतळ हा येथील दुसरा एक महत्त्वाचा विमानतळ आहे.
- लंडन स्टॅनस्टेड, लंडन लुटॉन आणि लंडन सिटी, लंडन साउथएंड हे इतर चार विमानतळ आहेत.
फेरी सेवा
लंडनमध्ये थेम्स नदीवर थेम्स क्लिपर नावाच्या बोटींमधून फेरीसेवा उपलब्ध आहे. ही सेवा रोजंदारीच्या प्रवाशांसाठी तसेच पर्यटकांसाठी वापरल्या जातात.[१५५] केनेरी व्हार्फ, लंडन ब्रिज, बॅटरसी पॉवर स्टेशन आणि लंडन आय सह अनेक धक्क्यांवरून ही सेवा गर्दीच्या वेळी दर २० मिनिटांनी तर इतर वेळी अधिक वेळेने सुटतात.[१५६] वूलविच फेरी ही फेरी सेवा नॉर्थ आणि साउथ सर्क्युलर रोड या महामार्गांना नदीमार्गे जोडते.[१५७]
Remove ads
लोकजीवन आणि संस्कृती
संगीत
पश्चिमात्य शास्त्रीय व रॉक संगीताच्या इतिहासात लंडनला मानाचे स्थान आहे. अनेक ऐतिहासिक संगीत विद्यालये व संस्था लंडन शहरात आहेत. लंडन सिंफनी ऑर्केस्ट्रा हा नावाजलेला संगीतचमू लंडनच्या बार्बिकन सेंटरमध्ये भरतो. बीटल्स, द रोलिंग स्टोन्स, पिंक फ्लॉइड, क्वीन हे जगातील सर्वात लोकप्रिय बँड लंडनमध्येच स्थापण्यात आले. तसेच एल्टन जॉन, डेव्हिड बोवी, जॉर्ज मायकल, एमी वाइनहाऊस इत्यादी प्रसिद्ध गायक व संगीतकार लंडनचे रहिवासी होते.
बागबगीचे
सुमारे ३५,००० एकर (१४,१६४ हेक्टर) विस्ताराचे बगीचे असलेले लंडन हे युरोपमधील सगळ्यात हरित शहरांपैकी एक आहे.[१५८]
शाही बगीचे

शहरमध्यातील हाइड पार्क, केन्सिंग्टन गार्डन्स आणि रीजंट्स पार्क हे मोठे बगीचे आठ शाही बगीच्यांपैकी सगळ्यात मोठे आहेत.[१५९] हाइड पार्कमध्ये क्रीडास्पर्धा होतात तसेच खुल्या आवारातील संगीतसमारंभही होतात. रीजंट्स पार्कमध्ये लंडन झू हे जगातील सगळ्यात जुने शास्त्रीय पद्धतीने चालविलेले प्राणी संग्रहालय आहे. मदाम तुसॉचे मेण पुतळे येथून जवळच आहेत.[१६०][१६१] हाइड पार्कपासून जवळच ग्रीन पार्क आणि सेंट जेम्स पार्क हे दोन इतर शाही बगीचे आहेत.[१६२] शहरमध्याबाहेर ग्रीनविच पार्क शहराच्या आग्नेयेस, बुशी पार्क आणि रिचमंड पार्क हे नैऋत्येस असे उरलेले शाही बगीचे आहेत. हॅम्प्टन कोर्ट पार्क हा राजमहालाभोवतीचा बगीचा ही शहरमध्याबाहेर आहे.[१६३]
इतर मोठे बागबगीचे
हॅम्पस्टेड हीथ हा मोठा बगीचा शहराजवळ आहे. येथील तळ्याजवळ अनेकदा खुले पाश्चात्य शास्त्रीय संगीताच्या मैफली होतात.[१६४] रिचमंड पार्क जवळील क्यू गार्डन्समध्ये जगातील सगळ्यात मोठा झाडे-झुडपे व वेलींचा संग्रह आहे. लंडनमधील बगीचे २००३पासून युनेस्को जागितक वारसास्थळ घोषित केले गेले.[१६५] लंडनचे बरो आपल्या प्रदेशांमधील बागांचे नियोजन व सांभाळ करतात. व्हिक्टोरिया पार्क, बॅटरसी पार्क आणि एपिंग फोरेस्ट हे शहरी वन यांत मोडतात.[१६६][१६७]
चालणे

लंडनमध्ये चालणे हा व्यायाम आणि मनोरंजनाचा लोकप्रिय प्रकार आहे. विंबल्डन कॉमन्स, एपिंग फॉरेस्ट, हॅम्प्टन कोर्ट पार्क आणि अनेक बगीचे तसेच कालवे आणि वापरात नसलेल्या रेल्वेमार्गांवरून चालत फिरणे हे लंडनवासीयांचा आवडता छंद आहे.[१६८] थेम्स नदीकाठचा थेम्स पाथ आणि वाँडल नदीकाठचा वाँडल ट्रेल हे चालण्याचे रस्ते लंडनमधून जातात.[१६९]
साहित्य, चित्रपट, दूरचित्रवाणी
लंडनमध्ये चार्ल्स डिकन्स, सर आर्थर कॉनन डॉइल, व्हर्जिनिया वूल्फ आणि रॉबर्ट लुई स्टीवन्सन यांसह अनेक ख्यातनाम लेखकांनी आपले लेखन केले होते. लंडनमध्ये कथानक असलेल्या प्रसिद्ध साहित्यकृतींमध्ये जेफ्री चॉसरच्या कँटरबरी टेल्स, डिकन्सची अ टेल ऑफ टू सिटीझ, डॉइलचे शेरलॉक होम्स कथासंच यांसह अनेकांचा समावेश आहे.

लंडनमध्ये आणि लगतच्या भागांमध्ये अनेक चित्रीकरण स्टुडियो आहेत. पाइनवूड, एल्सट्री, ईलिंग, विकेनहॅम तसेच वॉर्नर ब्रदर्सच्या या स्टुडियोंमधून जेम्स बाँड आणि हॅरी पॉटर शृंखलांसह अनेक नामवंत चित्रपटांचे चित्रीकरण झाले.[१७०][१७१] येथे विशेष दृष्य परिणाम तयार करणाऱ्या इमॅजिनेरियम, फ्रेमरस्टोन सारख्या अनेक कंपन्या आहेत.[१७२][१७३]
लंडनमध्ये ऑलिव्हर ट्विस्ट, स्क्रूज, पीटर पॅन, माय फेर लेडी, अ क्लॉक वर्क ऑरेंज, नॉटिंग हिल, द किंग्स स्पीच सारख्या अनेक चित्रपटांचे कथानक आहे. यांशिवाय १९५० च्या दशकातील सर अॅलेक गिनेसचे विनोदी चित्रपट, माँटी पायथॉन शृंखला, आणि रिचर्ड कर्टिसचे अनेक चित्रपट लंडनमध्ये घडतात. लंडनमधील प्रमुख चित्रपट व्यक्तिमत्त्वांमध्ये चार्ली चॅप्लिन, आल्फ्रेड हिचकॉक, मायकेल केन, जुली अँड्रुझ, पीटर सेलर्स, गॅरी ओल्डमन, एमा थॉम्पसन, गाय रिची, क्रिस्टोफर नोलन, ॲलन रिकमन, ज्यूड लॉ, हेलेना बॉनहॅम कार्टर, इद्रिस अल्बा, डॅनियल रॅडक्लिफ, कीरा नाइटली, देव पटेल, टॉम हॉलंड, डॅनियल डे-लुइस यांचा समावेश आहे.
१९४९पासून बॅफ्टा पुरस्कार हे ब्रिटिश अकादमी द्वारा दिले जातात..[१७४] १९५७पासून बीएफआय लंडन चित्रपट महोत्सव दर ऑक्टोबरमध्ये भरतो.[१७५]
लंडन हे दूरचित्रवाणी कार्यक्रमांच्या निर्माणाचे मोठे केन्द्र आहे. येथे टेलिव्हिजन सेंटर, आयटीव्ही, स्काय आणि फाउंटन स्टुडियोझ सारखी निर्माणगृहे आहेत. पॉप आयडॉल, द एक्स फॅक्टर, ब्रिटन्स गॉट टॅलेन्ट सारखे अनेक लोकप्रिय कार्यक्रम येथून सुरू झाले. कालांतराने हे कार्यक्रम जगातील अनेक देशांतून सुरू केले गेले.[१७६][१७७]
बेनी हिलचे विनोदी कार्यक्रम, रोवन ॲटकिन्सनची मिस्टर बीन शृंखला, साशा बॅरन कोहेनचा डा अली जी शो, ईस्टएंडर्स हे कार्यक्रम लंडनमधून प्रसारित झाले.[१७८][१७९]
मनोरंजन
मनोरंजन हे लंडन शहराच्या संस्कृती आणि अर्थकारणाचा मोठा हिस्सा आहे. यूकेच्या एकूण मनोरंजन अर्थार्जनाचा चौथा भाग फक्त लंडनमध्ये आहे.[१८०] येथे जगातील कोणत्याही शहरापेक्षा मोठा नाटके बघणारा प्रेक्षकवर्ग आहे[१८१] तसेच सर्वाधिक विनोदी कथाकथनाचे कार्यक्रम येथे होतात.[१८२]
लंडन शहरापासून ३२ किमी अंतरात यूकेमधील तीन मोठे मनोरंजन स्थळे- थॉर्प पार्क, चेसिंग्टन वर्ल्ड ऑफ अॅडव्हेंचर्स आणि लेगोलँड विंडसर रिसॉर्ट - आहेत.[१८३]
संग्रहालये, पुस्तकालये, कलादालने

लंडनमध्ये अनेक संग्रहालये आणि कलादालने आहेत. यांतील अनेकांमध्ये मोफत प्रवेश आहे. १७५३मध्ये स्थापन झालेले ब्रिटिश म्युझियम येथील सगळ्यात जुने आहे..[१८४] येथे जगभरातील ७० लाख पेक्षा अधिक वस्तू ठेवलेल्या आहेत. १८२४मध्ये नॅशनल गॅलेरी हे कलादालन सुरू झाले. ट्रफालगार स्क्वेरमध्ये असलेल्या या दालनात मुख्यत्वे पाश्चात्य चित्रकलेचे प्रदर्शन आहे.[१८५]
ब्रिटिश लायब्ररी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पुस्तकालय आहे. युनायटेड किंग्डमचे राष्ट्रीय पुस्तकालय असलेल्या या संस्थेच्या जगभर अनेक शाखा आहेत.[१८६] वेलकम लायब्ररी, डेना लायब्ररी अँड रीसर्च सेंटर, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मधील ब्रिटिश लायब्ररी ऑफ पोलिटिकल अँड इकोनॉमिक सायन्स, इंपिरियल कॉलेज मधील अब्दुस सलाम लायब्ररी, किग्स कॉलेज मधील मॉघन लायब्ररी आणि युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधील सेनेट हाउस लायब्ररी ही लंडनमधील इतर मोठी संग्रहालये आहेत.[१८७]
Remove ads
प्रसारमाध्यमे

लंडनमध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, आयटीव्ही, चॅनल ४, चॅनल ५, स्काय यांसह अनेक मोठ्या आणि जगभर व्याप असलेल्या मीडिया कंपन्या स्थित आहेत.[१८८]
द टाइम्स या १७८५पासून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रासह देशातील सगळी मोठी प्रकाशनगृहे येथील फ्लीट स्ट्रीट भागात आहेत.[१८९]
डब्ल्यूपीपी ही जगातील सगळ्यात मोठी जाहिरात कंपनीचे मुख्यालय येथे आहे.[१९०]
शिक्षण

लंडन हे उच्च शिक्षणासाठीचे जगातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. लंडन महानगरामध्ये एकूण ४३ (युरोपात सर्वाधिक) विद्यापीठे आहेत. २००८ साली ४.१२ लाख विद्यार्थी लंडनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. १.२५ लाख विद्यार्थिसंख्या असलेला लंडन विद्यापीठ हा युरोपातील सर्वात मोठा विद्यापीठसमूह आहे. लंडन विद्यापीठामध्ये १९ स्वतंत्र उप-विद्यापीठे व १२ संशोधन संस्था आहेत. अनेक अहवालांनुसार, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, इंपीरियल कॉलेज लंडन, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन व्यापार विद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था या जगातील सर्वोत्कृष्ट संस्था आहेत.
प्राथमिक आणि माथ्यमिक शिक्षण
लंडनमधील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक शाळा स्थानिक बरोंच्या प्रशासनाद्वारे चालविल्या जातात. याशिवाय येथे अनेक खाजगी शाळा आहेत. यांत जॉन लायन स्कूल, हायगेट स्कूल आणि इंग्लंडचे सहा पंतप्रधान शिकलेली हॅरो स्कूल आहेत.[१९१]
उच्चशिक्षण

युनिव्हर्सिटी ऑफ लंडन हे युनायटेड किंग्डममधील सगळ्यात मोठे विद्यापीठ आहे.[१९२] यांत पाच मोठ्या शिक्षणसंस्था - सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, क्वीन मेरी, किंग्स कॉलेज, रॉयल हॉलोवे आणि युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन - असून अनेक इतर छोट्या संस्था आहेत. बर्कबेक कॉलेज, कोरटॉल्ड इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स, गोल्डस्मिथ्स, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीन, रॉयल अकॅडेमी ऑफ म्युझिक, सेन्ट्रल स्कूल ऑफ स्पीच अँड ड्रामा, रॉयल व्हेटर्नरी कॉलेज, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स या विशेष शिक्षण देणाऱ्या संस्थाही या विद्यापीठाचा भाग आहेत.[१९३] लंडनमधील आवाराशिवाय सुमारे ४८,०० विद्यार्थी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून दूरस्थ शिक्षण घेतात.[१९४]

युनिव्हर्सिटी ऑफ लंडन शिवाय शहरात ब्रुनेल युनिव्हर्सिटी, इम्पिरियल कॉलेज, किंग्स्टन युनिव्हर्सिटी, लंडन मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन साउथ बँक युनिव्हर्सिटी, मिडलसेक्स युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स, लंडन अशी अनेक विद्यापीठे आहेत.[१९५]

लंडनमध्ये पाच मोठी वैद्यकीय महाविद्यालये आहेत - बार्ट्स अँड द लंडन स्कूल ऑफ मेडिसीन अँड डेन्टिस्ट्री (क्वीन मेरी, युनिव्हर्सिटी ऑफ लंडनचा भाग), किंग्स कॉलेज लंडन, इम्पिरियल कॉलेज स्कूल ऑफ मेडिसीन, यूसीएल मेडिकल स्कूल आणि सेंट जॉर्जेस, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन. यांना संलग्न अनेक रुग्णालये आहेत. जैववैद्यकीय संशोधनाचे लंडन हे मोठे केन्द्र आहे.[१९६] फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी १८६०मध्ये सेंट थॉमस हॉस्पिटलच्या अंतर्गत स्थापन केलेले फ्लोरेन्स नाइटिंगेल फॅकल्टी ऑफ नर्सिंग अँड मिडवाइफरी हे महाविद्यालय आता किंग्स कॉलेजचा भाग आहे.[१९७]
शहरात अनेक नामवंत वाणिज्य आणि व्यवस्थापन महाविद्यालये आहेत. लंडन स्कूल ऑफ बिझनेस अँड फायनान्स, कॅस बिझनेस स्कूल, हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूल, युरोपियन बिझनेस स्कूल लंडन, इम्पिरियल कॉलेज बिझनेस स्कूल आणि लंडन बिझनेस स्कूल त्यांतील काही आहेत.
ज्ञानप्रसारक संस्था
लंडनमध्ये खूप पूर्वीपासून ज्ञानप्रसारक संस्था आहेत. यांत १६६०मध्ये स्थापन झालेली[१९८] रॉयल सोसायटी, १७९९मध्ये स्थापन झालेली रॉयल इन्स्टिट्युशन आहेत. १८२५पासून येथील व्याख्यानमालेतून सामान्य नागरिकांना विज्ञान आणि संबंधित विषयांवर ज्ञान मिळते. येथे व्याख्याने देणाऱ्यांमध्ये मायकेल फॅराडे, फ्रँक व्हाइट, डेव्हिड ॲटनबरो तसेच रिचर्ड डॉकिन्स सारख्या ख्यातनाम शास्त्रज्ञांचा समावेश आहे.[१९९]
Remove ads
खेळ

लंडनमधील लॉर्ड्स हे क्रिकेटच्या खेळाचे माहेरघर समजले जाते.[२००] लॉर्डस आणि ओव्हल या क्रिकेट जगतातील दोन ऐतिहासिक व प्रतिष्ठेची मैदानांवर इंग्लंड क्रिकेट संघ खेळतो. लॉर्ड्स मैदान मिडलसेक्स काउंटी क्लबचे तर ओव्हल हे सरे काउंटी क्लबचे घरचे मैदान आहे. लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे ४ अंतिम सामने खेळले गेले आहेत.
१८७७पासून विंबल्डन टेनिस स्पर्धा दर वर्षी जून-जुलैमध्ये ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोके क्लब येथे खेळली जाते.[२०१] ही जगातील सगळ्यात जुनी टेनिस स्पर्धा आङे आणि सगळ्यात प्रतिष्ठेची मानली जाते.[२०२][२०३]
लंडनने आजवर १९०८, १९४८ व २०१२ ह्या तीन वेळा ऑलिंपिक खेळांचे आयोजन केले आहे. तीन वेळा ऑलिंपिक यजमानपदाचा बहुमान मिळवणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे. २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी येथे नवीन ऑलिंपिक मैदान बांधले गेले.
फुटबॉल हा लंडनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लंडन परिसरात १४ व्यावसायिक फुटबॉल क्लब आहेत ज्यांपैकी आर्सेनल, चेल्सी, फुलहॅम, क्वीन्स पार्क रेंजर्स व टॉटेनहॅम हॉटस्पर हे पाच क्लब इंग्लिश प्रीमियर लीगचे सदस्य आहेत. यांशिवाय एएफसी विंबल्डन, बार्नेट एफ.सी., ब्रॉमली एफ.सी., चार्ल्टन ॲथलेटिक एफ.सी., डॅगेनहॅम अँड रेडब्रिज एफ.सी., लेटन ओरियेंट एफ.सी., मिलवॉल एफ.सी., क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी. आणि सटन युनायटेड एफ.सी. हे इतर प्रमुख पुरुषांचे फुटबॉल क्लब आहेत. आर्सेनल डब्ल्यू.एफ.सी., चेल्सी एफ.सी. विमेन, टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी. विमेन आणि वेस्ट हॅम युनायटेड एफ.सी. विमेन हे विमेन्स सुपर लीगमधील चार महिला फुटबॉल क्लब लंडनमध्ये आहेत.
१९२४ सालापासून इंग्लंड फुटबॉल संघाचे स्थान जुने वेंब्ली मैदान येथे आहे. २००७ साली हे स्टेडियम पाडून त्याच ठिकाणी ९०,००० प्रेक्षकक्षमता असलेले नवे वेंब्ली स्टेडियम उभारण्यात आले.
रग्बी युनियनच्या प्रीमियरशिप स्पर्धेतील हार्लेक्विन आणि सारासेन्स हे दोन संघ लंडनमध्ये आहेत.[२०४] ईलिंग ट्रेलफाइंडर्स आणि लंडन स्कॉटिश हे संघ आरएफयू चँपियनशिप स्पर्धेत खेळतात. रिचमंड, रॉसलिन पार्क, वेस्टकॉम्ब पार्क आणि ब्लॅकहीथ हे शहरातील इतर स्पर्धात्मक रग्बी क्लब आहेत. लंडन ब्रॉन्कोझ हा रग्बी लीग संघ सुपर लीगमध्ये खेळतो. ट्विकनहॅम स्टेडियम हे मैदान इंग्लंडच्या राष्ट्रीय रग्बी संघाचे घरचे मैदान आहे.[२०५]
वेंटवर्थ क्लब हा प्रतिष्ठित गोल्फ क्लब व्हर्जिनिया वॉटर या उपनगरात असून द ओपन चँपियनशिप केंटमधील सँडविच शहरात सगळ्यात जुनी गोल्फ मेजर स्पर्धा रॉयल सेंट जॉर्ज क्लब येथे खेळली जाते.[२०६] उत्तर लंडनमधील अलेक्झांड्रा पॅलेस येथे दर वर्षी पीडीसी डार्ट चँपियनशिप आणि स्नूकरची मास्टर्स स्पर्धा खेळली जाते. लंडन मॅरेथॉन ही स्पर्धा लोकप्रिय असून जगभरातील हजारो स्पर्धक यात धावतात.[२०७] थेम्स नदीवर प्रतिवर्षी युनिव्हर्सिटी बोट रेस ही ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांमधील चुरशीची बोट स्पर्धा भरते..[२०८]
पर्यटन
लंडन हे जगातील आघाडीचे पर्यटनस्थळ आहे.[२०९] २०१५मध्ये हे जगातील सर्वाधिक भेटी दिलेले शहर होते. या वर्षी सुमारे ६ कोटी ५० लाख पर्यटक येथे आले होते.[२१०] परदेशी पर्यटक येथे सगळ्यात जास्त पैसे खर्च करतात. २०१५मध्ये पर्यटकांनी लंडन शहरात अंदाजे २०.२३ अब्ज पाउंड (२,२०३ अब्ज किंवा २२ महापद्म रुपये) खर्च केले[२११] लंडनमधील सुमारे ७,००,००० लोक पर्यटनक्षेत्रात काम करतात आणि एकूण आर्थिक उलाढाल ३६ अब्ज पाउंड (३७ महापद्म रुपये) इतकी आहे.[२१२] युनायटेड किंग्डममधील एकूण पर्यटकांपैकी ५४% पर्यटक लंडनपासून त्यांचा प्रवास सुरू करतात.[२१३]
२०२३ मध्ये लंडनच्या होटेलांमधून १,५५,७०० खोल्या उपलब्ध होत्या. ही संख्या चीन सोडून जगातील शहरांपैकी सर्वाधिक आहे. हा आकडा काही वर्षांतच १,८३,६०० इतका होण्याचा अंदाज आहे.[२१४] या होटेलांमध्ये सव्हॉय (१८८९ पासून), क्लॅरिजेस (१८१२ पासून), रित्झ (१९०६ पासून)) आणि डोर्चेस्टर (१९३१ पासून) सारख्या महागड्या होटेलांपासून ट्रॅव्हेलॉज, सोफिटेल आणि प्रीमियर इन सारख्या किफायती नावांचा समावेश आहे.[२१५]
जुळी शहरे
खालील शहरांचे लंडनसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads