तेलंगणा (लेखनभेद: तेलंगण किंवा तेलंगाण) भारताचे २९वे राज्य आहे. जून २, इ.स. २०१४ रोजी स्थापन झालेले हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते. या प्रदेशाची प्राचीन नावे तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग अशी होती.
तेलंगणा भौगोलिक दृष्ट्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमांलगत आहे. तांदूळ हे मुख्य पीक असलेला हा प्रदेश गोदावरी खोऱ्यात असून हा भाग ऐतिहासिक काळात सातवाहन (इ.स.पू. २२१ - इ.स. २१८), गोवळकोंड्याची कुतुबशाही (इ.स. १५२० - इ.स. १६८७) आणि हैदराबादचा निजाम (इ.स. १७२४ - इ.स. १९४८) यांच्या सत्तेखाली राहिला. इ.स.च्या विसाव्या व एकविसाव्या शतकात साम्यवाद आणि नक्षल विचारप्रणालींचा लक्षणीय प्रभाव या प्रदेशावर आढळतो. हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर इ.स. १९४८ साली हा भाग स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाला. हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर तेलुगू ही प्रमुख भाषा आहे.

इतिहास
तेलंगणा हे वेगळे राज्य घोषित करण्यात यावे, यासाठी अनेक वर्षे तेलंगण राष्ट्रीय समितीने लढा चालवला होता. डिसेंबर ९, २००९ रोजी या प्रयत्नांना यश येऊन भारत सरकारने तेलंगणा हे वेगळे राज्य होणार असल्याचे जाहीर केले. तेलंगण राज्याच्या स्थापनेसाठीचे विधेयक १५ व्या लोकसभेत १८ फेब्रुवारी २०१४ला आणि राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात २० फेब्रुवारी २०१४ला संमत करण्यात आले आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले.
तेलंगणा राज्यात पुढील जिल्हे आहेत. आदिलाबाद, करीमनगर, कामारेड्डी, कुमारम् भीम आसिफाबाद, खम्माम, जगतियाळ, जयशंकर भूपालपल्ली, जानगाव, जोगुलांबा गडवाल, नागरकुर्नूल, नारायणपेट, नालगोंडा, निजामाबाद, निर्मल, पेद्दापल्ली, भद्राद्रि कोठागुंडम, मंचरियाल, महबूबनगर, महबूबाबाद, मेडक, मेडचल-मलकजगिरी, मुळुगू, यादाद्री भुवनगिरी, रंगारेड्डी, राजन्ना सिरकिला, वनपर्थी, वारंगळ ग्रामीण, वारंगळ शहर, विकाराबाद, संगारेड्डी, सिद्दीपेट, सूर्यापेट, हैदराबाद.
प्रमुख शहरे
वाहतूक
हैदराबाद शहर हे तेलंगणामधील सर्वात मोठे वाहतूक केंद्र आहे. हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतामधील एक प्रमुख विमानतळ असून येथून देशातील सर्व मोठ्या शहरांसाठी तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय सिकंदराबाद रेल्वे स्थानक येथे असून हैदराबाद रेल्वे स्थानक, वारंगळ रेल्वे स्थानक इत्यादी मोठी स्थानके देशातील इतर भागांसोबत जोडली गेली आहेत. तेलंगणा एक्सप्रेस, सिकंदराबाद राजधानी एक्सप्रेस इत्यादी जलद गाड्या हैदराबादला दिल्लीसोबत जोडतात. चारमिनार एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, गोळकोंडा एक्सप्रेस इत्यादी येथील प्रसिद्ध गाड्या आहेत.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- ई-तेलंगण.ऑर्ग Archived 2020-02-25 at the Wayback Machine.
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.