पॅरिस

From Wikipedia, the free encyclopedia

पॅरिस
Remove ads

पॅरिस (फ्रेंच: Paris Fr-Paris.oga पारि ) ही फ्रान्स देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. उत्तर फ्रान्समध्ये इल-दा-फ्रान्स ह्या प्रांतात सीन नदीच्या काठावर वसलेले पॅरिस महानगर (फ्रेंच: Région parisienne) युरोपातील सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांपैकी एक आहे.[] पॅरिस शहराची लोकसंख्या २१,९३,०३१ इतकी तर महानगर पॅरिसची लोकसंख्या १,१८,३६,९७० एवढी आहे.[]

जलद तथ्य

राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा ह्या सर्व क्षेत्रात फ्रान्समध्ये अग्रेसर असणारे पॅरिस हे एक महत्त्वाचे जागतिक शहर मानले जाते.[] येथे युनेस्को, आर्थिक सहयोग व विकास संघटना इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालये आहेत.

पॅरिस महानगराचे एकूण उत्पन्न ५५२.७ अब्ज युरो[] एवढे असून ते युरोपामध्ये सर्वांत जास्त तर जगात सहाव्या क्रमांकावर आहे.[] २०१० साली घेण्यात आलेल्या एका अहवालानुसार पॅरिस हे जगातील सर्वांत महागडे शहर आहे.[] २००९[] व २०१०[][] साली पॅरिसला जगातील सर्वोच्च ३ महत्त्वाच्या व प्रभावशाली शहरांमध्ये स्थान मिळाले आहे. २०२०[१०] व २०२५[११] सालामधील जगातील १० सर्वांत श्रीमंत व समृद्ध शहरांमध्ये देखील पॅरिसचा उल्लेख आहे. ह्या गटातील इतर शहरे शांघाय, साओ पाउलो, तोक्यो, न्यू यॉर्कलंडन ही आहेत.

पॅरिस हे जगातील सर्वांत लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दरवर्षी अंदाजे ४.५ कोटी लोक भेट देतात.[१२] जगप्रसिद्ध आयफेल टॉवरलूव्र संग्रहालय तसेच इतर अनेक ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये व उद्याने पॅरिसमध्ये आहेत.

Remove ads

नाव

पॅरिस हे नाव लोह युगादरम्यान ह्या भागात वसाहत करणाऱ्या पारिसी ह्या जमातीवरून ठेवण्यात आलेले आहे. रोमन युगादरम्यान ह्या शहराचे नाव लुतेतिया (Lutetia Parisiorum) असे होते. इ.स. ३६० - ३६३ मध्ये त्याचे पुन्हा नामांतर करून पॅरिस हे नाव ठेवण्यात आले.[१३]

पॅरिस शहराची अनेक टोपणनावे आहेत परंतु प्रकाशाचे शहर (फ्रेंच: La Ville-Lumière) हे सर्वांत लोकप्रिय टोपणनाव आहे.[१४] पॅरिसच्या नागरिकांना पारिजियां (Parisiens) असे संबोधले जाते.[१५]

पॅरिस याच नावाची शहरे फ्रान्सशिवाय इलिनॉय, अर्कान्सॉं, इडाहो, टेनेसी आणि टेक्सास या पाच अमेरिकन राज्यांमध्येही आहेत.

Remove ads

इतिहास

Thumb
रोमन साम्राज्याचे अवशेष

पॅरिस येथे सापडलेले सर्वांत जुने पुरातात्त्विक अवशेष इ.स. पूर्व ४२०० सालातील असल्याचा अंदाज बांधला गेला आहे.[१६] पारिसी ही जमात इ.स. पूर्व २५० दरम्यान सीन नदीच्या काठावर वसाहत करून राहत असल्याच्या खुणा सापडल्या आहेत.[१७] रोमन साम्राज्याने इ.स. पूर्व ५२ ते अंदाजे इ.स. ५०८ ह्या दरम्यान पॅरिसवर राज्य केले व ह्या काळात पॅरिस हे एक सुबत्त शहर बनले.[१८] परंतु रोमन साम्राज्याचा अस्तानंतर काही काळ पॅरिसची अधोगती होत गेली.[१६] फ्रॅंकिश राजा क्लोव्हिस पहिला ह्याने इ.स. ५०८ साली पॅरिस ही आपल्या राज्याची राजधानी बनवली.

पॅरिसवर ब्रिटिशांची पहिली स्वारी विल्यम्स याच्या रूपाने इ.स. १०६६ मध्ये झाली. जोन ऑफ आर्कने १०० वर्षांच्या संघर्षानंतर इ.स. १४२० मध्ये पॅरिसवर विजय मिळवला. इ.स. १४३० मध्ये हेन्री सहावा ह्याचा फ्रान्सचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी जोन ऑफ आर्कला भर चौकात जिवंत जाळण्यात आलं. चार्ल्स सातवा याने इ.स. १४३७ मध्ये पॅरिसवरचं ब्रिटिशराज संपुष्टात आणलं. त्यानंतर उत्तरोत्तर या शहराची भरभराट होत गेली..[१९]

Thumb
१८८९ सालामधील पॅरिसचे चित्र

इ.स. १३४८ ते १३५० दरम्यान युरोपात आलेल्या काळ्या मृत्यूच्या साथीच्या आधी पॅरिसची लोकसंख्या २ लाख एवढी होती.[२०] १५व्या व १६व्या शतकामध्ये प्लेग हा रोग पॅरिस शहरात थैमान घालीत असे.[२१] १४६६ साली येथे आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये ४०,००० लोक दगावले.[२२] तसेच १८३२ व १८४९ साली येथे आलेल्या कॉलराच्या साथीमध्ये २०,००० लोक मरण पावले.[२३]

फ्रान्समध्ये १८व्या शतकाच्या शेवटास क्रांतीदरम्यान घडलेल्या हालचालींचे पॅरिस हे एक महत्त्वपूर्ण केंद्र होते.[२४] १८व्या व १९व्या शतकामध्ये युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे पॅरिसच्या विकासाला मोठी चालना मिळाली. ह्या दरम्यान फ्रान्समध्ये अनेक रेल्वेमार्ग बांधले गेले ज्यामुळे पॅरिसमध्ये स्थलांतराचा अविरत ओघ सुरू झाला. १८५२ साली तिसऱ्या नेपोलियनने पॅरिसमधील अरुंद व गुंतागुंतीचे रस्ते जमीनदोस्त करून रूंद व सुंदर मार्ग बांधले जे आजही अस्तित्वात आहेत.[२५] १९व्या शतकाच्या शेवटास पॅरिसमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचे आयोजन केले गेले ज्यामुळे कला, तंत्रज्ञान, वास्तूशास्त्र, पर्यटन इत्यादी बाबतीत पॅरिस हे जगातील एक मोठे केंद्र बनले.[२६] जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपॅरिस मेट्रो ह्यांच्या मुळ कल्पना ह्याच प्रदर्शनांमधून साकारण्यात आलेल्या आहेत.

Thumb
ऑगस्ट १९४४ मध्ये नाझी जर्मनीच्या तावडीतून पॅरिसची सुटका

पहिल्या महायुद्धादरम्यान वाटाघाटी व डावपेचांचे पॅरिस हे एक महत्त्वपूर्ण केंद्र होते. दोन महायुद्धांच्या मधल्या काळात कला व संस्कृती ह्या क्षेत्रांत पॅरिसचे महत्त्व प्रचंड वाढले. ह्याच काळात पिकासोसह अनेक जगप्रसिद्ध कलाकारांनी पॅरिस येथे वास्तव्य केले होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये १४ जून १९४० रोजी पॅरिसचा पाडाव झाला व अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सेनेने पॅरिसवर कब्जा मिळवला.[२७] त्यानंतर पुढची ४ वर्षे पॅरिस नाझी जर्मनीच्या सत्तेखाली होते.[२८] तरीही ह्या काळामध्ये पॅरिसवर कोणतेही मोठे हवाई हल्ले झाले नाहीत व जवळजवळ संपूर्ण शहर पडझडीपासुन बचावले गेले.

दुसऱ्या महायुद्धानंतर पॅरिसचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. येथे मोठी उपनगरे, नवीन व्यापारी जिल्हा, अनेक भुयारी रेल्वे मार्ग, द्रुतगती महामार्ग बांधले गेले.[२९][३०][३१] १९७० सालानंतर मात्र काही प्रमाणात पॅरिस शहर लयाला गेले आहे. शहराच्या काही भागातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न युरोपामध्ये सर्वाधिक आहे[३२][३३][३४] तर इतर भागांमध्ये गरिबी, बेरोजगारी व बकाली[३५][३६] ह्या कारणामुळे येथील सामाजिक अस्थैर्य वाढत राहिले आहे.

दहशतवाद हा पॅरिसमधील एक प्रमुख कायदा व सुरक्षेचा विषय बनला आहे. ७ जानेवारी २०१५ रोजी दोन मुस्लिम अतिरेक्यांनी शार्ली एब्दो ह्या उपहासात्मक मासिकाच्या मुख्य कार्यालयावर हल्ला चढवला ज्यात तीन पोलीस अधिकाऱ्यांसह १३ लोक ठार झाले. हा हल्ला शार्ली एब्दोने मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र छापल्यामुळे करण्यात आला. १३ नोव्हेंबर २०१५ रोजी आयसिसने पॅरिस महानगरामध्ये घडवून आणलेल्या हल्ल्यांमध्ये १२९ लोक मृत्यूमुखी पडले. दुसऱ्या महायुद्धानंतर पॅरिसमध्ये घडलेली ही सर्वात हिंसक घटना होती.

Remove ads

भूगोल

पॅरिस शहर सीन नदीच्या काठांवर सपाट भागावर वसले आहे. येथील सर्वांत खोल ठिकाण समुद्रसपाटीपासुन ११५ फूट तर सर्वांत उंच टेकडी ४२७ फूट उंच आहे.[३७] सध्या पॅरिसचे क्षेत्रफळ १०५.३९ वर्ग किमी इतके आहे.[३८]

हवामान

पॅरिसमधील हवामान इतर पश्चिम युरोपीय शहरांप्रमाणे सौम्य व आर्द्र आहे.[३९]

अधिक माहिती Paris (1971–2000) साठी हवामान तपशील, महिना ...

शहर रचना

Thumb
संध्याकाळच्या वेळेला टिपलेले पॅरिस शहराचे दृष्यपटल

अर्थकारण

युरोपाच्या व जगाच्या अर्थकारणात पॅरिसचा महत्त्वाचा सहभाग आहे. २००८ साली पॅरिस शहराचा जीडीपी ५५२.१ अब्ज युरो [] एवढा होता. एका अहवालानुसार ह्या बाबतीत जगातील शहरांमध्ये पॅरिसचा सहावा क्रमांक लागतो.[४१] पॅरिस हा जर वेगळा देश असता तर जागतिक जीडीपी क्रमवारीमध्ये त्याचा १७वा क्रमांक लागला असता.[४२] फ्रान्सच्या एकूण लोकसंख्येच्या १८.८% लोकसंख्या पॅरिस महानगरामध्ये एकवटली असली तरीही फ्रान्सच्या एकूण उत्पन्नामध्ये पॅरिसचा वाटा २८.९% इतका आहे.[४३] पॅरिस महानगरामध्ये एकूण ३७ फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपन्यांची मुख्यालये आहेत.[४४] ह्या बाबतीत पॅरिसचा जगात दुसरा क्रमांक (तोक्योच्या खालोखाल) लागतो. असे असतानाही पॅरिसच्या काही गरीब व दुर्लक्षित उपनगरांमध्ये २० ते ४०% लोक बेरोजगार आहेत.

[[चित्|right|thumb|250 px|पॅरिसमधील ला दिफॉं व्यापारी जिल्हा]] पॅरिसच्या पश्चिम भागातील ला दिफॉं हा युरोपातील सर्वांत मोठा औद्योगिक व व्यावसायिक जिल्हा आहे. पॅरिसची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उद्योगावर अवलंबुन असली तरी युरोपातील उत्पादन उद्योगाचे पॅरिस हे मोठे केंद्र आहे. विशेषतः वाहने, विमाने व इलेक्ट्रॉनिक उत्पादने पॅरिस भागात बनवली जातात. पर्यटन हा पॅरिसमधील एक मोठा व्यवसाय असून ६.२% लोक ह्या व्यवसायात काम करतात.[४५]

पॅरिसचा जीडीपी

आर्थिक दृष्ट्या पॅरिस हे जगातील सर्वांत मोठ्या केंद्रांपैकी एक आहे.[४१]

अधिक माहिती क्र., महानगर ...
Remove ads

प्रशासन

ज्यांचा लोकसंख्या वाढीबरोबर विस्तार झाला नाही अशा जगातील फार थोड्या शहरांपैकी पॅरिस हे एक आहे. पॅरिस शहराच्या प्रशासकीय सीमा १८६० सालापासून बदलल्या गेलेल्या नाहीत.

शहर प्रशासन

Thumb
पॅरिसचे २० जिल्हे
Thumb
पाले दे लेलिजे, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान
Thumb
पाले दू लक्झेंबर्ग, फ्रेंच सेनेटची वास्तू

१८६० साली पॅरिस शहर एकूण २० प्रशासनिक जिल्ह्यांमध्ये (फ्रेंच: arrondissements) विभागण्यात आले जे आजही कायम आहेत.

अधिक माहिती जिल्हा, क्षेत्रफळ (वर्ग किमी) ...

राजधानी

पॅरिस ही फ्रान्सची राष्ट्रीय राजधानी असल्यामुळे पुष्कळशी महत्त्वाची सरकारी कार्यालये पॅरिसमध्ये स्थित आहेत. पाले दे लेलिजे हे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान व ओतेल मातियों (फ्रेंच: Hôtel Matignon) हे फ्रान्सच्या पंतप्रधानांचे कार्यालय पॅरिसमध्ये आहेत.

फ्रेंच संसदेच्या दोन्ही गृहांच्या (सेनेट व असेंब्ली) वास्तू व फ्रान्सचे सर्वोच्च न्यायालय पॅरिसमध्येच आहेत.

राष्ट्रीय राजधानीसोबतच पॅरिस इल-दा-फ्रान्स ह्या प्रांताची देखील राजधानी आहे.

Remove ads

वस्तीविभागणी

पॅरिस प्रदेशाची लोकसंख्या
(२००७ मधील गणनेनुसार)
Thumb
भागलोकसंख्या
२००७
क्षेत्रफळ
वर्ग किमी
घनता
/ वर्ग किमी
१९९९-२००७
संख्यावाढ
पॅरिस शहर
(७५वा विभाग)
२१,९३,०३११०५२०,८०७+०.४०%/वर्ष
आंतरिक भाग
(९२, ९३ व ९४वे विभाग)
४३,४९,६४०६५७६,६२२+०.९५%/वर्ष
बाह्य भाग
(७७, ७८, ९१ व ९५वे विभाग)
५०,५६,१७३११,२५०४४९+०.७०%/वर्ष
इल-दा-फ्रान्स
(संपूर्ण प्रदेश)
१,१५,९८,८४४१२,०१२९६६+०.७४%/वर्ष

१९९९ सालच्या जनगणनेनुसार पॅरिस शहराची लोकसंख्या २१,२५,२४६ इतकी होती. १९२१ साली पॅरिसच्या लोकसंख्येने २९ लाख इतका उच्चांक गाठला होता. त्यानंतरच्या काळात उपनगरांच्या वाढीमुळे अनेक लोकांनी उपनगरांमध्ये स्थलांतर केल्यामुळे मूळ पॅरिस शहराची लोकसंख्या घसरत राहिली. जगातील जवळजवळ सर्व मोठ्या शहरांमध्ये अशा तऱ्हेचा प्रवाह आढळतो परंतु पॅरिसच्या बाबतीत ही लोकसंख्या घट लक्षणीय आहे. परंतु जुलै २००४ मधील अंदाजानुसार १९५४ नंतर प्रथमच पॅरिसची लोकसंख्या वाढल्याचे संकेत मिळाले आहेत.

पॅरिस हे जगातील सर्वाधिक दाट वस्ती असलेल्या शहरांपैकी एक आहे. येथे दर वर्ग किमी जागेमध्ये २४,४४८ लोक राहतात. ११वा जिल्हा सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा असून ह्या जिल्ह्यामध्ये दर वर्ग किमी जागेमध्ये ४०,६७२ वस्ती आहे. पेरिस हे फ्रान्समधील पाचवे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे शहर आहे व वरील क्रमांकाची सर्व शहरे ही पॅरिसची उपनगरे आहेत.

ऐतिहासिक काळापासून इतर देशांमधून स्थलांतर करणाऱ्या लोकांसाठी पॅरिस हे एक मोठे आकर्षण राहिले आहे.[४६] युरोपामधील सर्वाधिक देशांतरवासी लोक राहत असलेल्या शहरांमध्ये पॅरिसचा वरचा क्रमांक लागतो. १९९९ च्या गणनेनुसार पॅरिसमधील १९.४% नागरिक इतर देशांमध्ये जन्मले आहेत.[४७][४८] फ्रान्सने एकोणिसाव्या शतकात आफ्रिका आणि आजूबाजूच्या मुस्लिम राष्ट्रांवर वर्चस्व स्थापित केल्यापासून मुस्लिम पॅरिसमध्ये येऊ लागले. त्यात प्रामुख्याने अल्जीरिया आणि उत्तर आफ्रिकेतून स्थलांतरित झालेल्यांचा भरणा आहे. आजमितीला फ्रान्समध्ये दुसरा धर्म इस्लाम आहे.

Remove ads

वाहतूक व्यवस्था

Thumb
गार दू नॉर्द हे पॅरिसमधील रेल्वे स्थानक युरोपातील सर्वात वर्दळीचे आहे.
Thumb
एर फ्रान्सचा कार्यकेंद्र पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल येथे आहे.

पॅरिस शहरामधील वाहतूक व्यवस्था विभिन्न व अत्यंत गुंतागुंतीची आहे. Syndicat des transports d'Île-de-France (STIF) ही संस्था पॅरिसमधील मुख्य वाहतूक प्रशासन संस्था आहे.[४९] ह्या संस्थेद्वारे पॅरिस भागात ६५४ बस मार्ग, मेट्रो भुयारी रेल्वे, उपनगरी रेल्वे व ट्राम मार्ग चालवले जातात.

मेट्रो ही पॅरिसमधील सर्वांत महत्त्वाची दळणवळण सेवा आहे. मेट्रोचे एकूण १६ मार्ग व ३०० स्थानके आहेत. मेट्रोच्या दोन स्थानकांमधील अंतर अत्यंत कमी असल्यामुळे मेट्रोचे मार्ग पॅरिसच्या उपनगरांमध्ये वाढवणे अवघड झाले आहे. मेट्रोचे बरेचसे मार्ग जुने आहेत. ऑक्टोबर १९९८ मध्ये ७० वर्षांनंतर पॅरिसमधे नवा मेट्रोचा मार्ग सुरू करण्यात् आला. मेट्रोवरील ताण कमी करण्यासाठी १९७७ साली आरईआर (फ्रेंच: Réseau Express Régional) ही नवीन जलद वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. आरईआर सेवेचे ५ मार्ग व २५७ स्थानके आहेत व ह्यांद्वारे पॅरिसची उपनगरे जोडली गेली आहेत. ह्या व्यतिरिक्त पॅरिसमध्ये ४ ट्राम मार्ग कार्यरत आहेत तर ६ नवीन मार्गांचे काम सुरू आहे. फ्रेंच रेल्वेचे पॅरिस हे सर्वांत मोठे व मध्यवर्ती केंद्र आहे. पॅरिस शहरात सहा रेल्वे स्थानके आहेत व चार द्रुतगती रेल्वे मार्ग पॅरिसमधून जातात.

पॅरिस भागात ओर्लिचार्ल्स दि गॉल हे दोन मोठे विमानतळ आहेत. २००९ साली चार्ल्स दि गॉल हा युरोपातील दुसरा तर जगातील सहाव्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता[५०] तर ओर्लि हा युरोपातील ११व्या क्रमांकाचा विमानतळ होता.[५०] एर फ्रान्स ह्या फ्रान्सच्या राष्ट्रीय विमानसेवेचा चार्ल्स दि गॉल हा सर्वांत मोठा हब आहे. पॅरिसमध्ये एकूण सहा लांब पल्ल्याची रेल्वे स्थानके आहेत. एस.एन.सी.एफ. (फ्रेंच: Société Nationale des Chemins de fer français) ह्या फ्रान्समध्ये रेल्वे सेवा चालवणाऱ्या कंपनीच्या टीजीव्ही ह्या दृतगती रेल्वेचे चार प्रमुख मार्ग पॅरिसमधून जातात. युरोस्टार ह्या चॅनल टनेलमधून जाणाऱ्या रेल्वेमुळे पॅरिस ते लंडन हा रेल्वे प्रवास शक्य आहे. तसेच युरोपातील ब्रसेल्स, क्योल्न इत्यादी अनेक शहरांमध्ये अतिजलद फ्रेंच रेल्वे गाड्या पोचतात. [[फ्रान्सच्या राष्ट्रीय व द्रुतगती महामार्गांचे पॅरिसमध्ये मोठे जाळे आहे. पॅरिस शहराभोवती तीन द्रुतगती मार्ग अस्तित्वात आहेत. पॅरिसमध्ये एकूण २,००० किमी लांबीचे महामार्ग व द्रुतगती मार्ग आहेत. ह्या अद्ययावत रस्ता व रेल्वे मार्गांमुळे युरोपातील जवळजवळ सर्व मोठ्या शहरांमध्ये पॅरिसहून १२ तासांच्या आत पोचता येते.

Remove ads

संस्कृती

Thumb
पाले गानिये

प्राचीन काळापासून पॅरिस हे युरोपामधील कलेचे व संस्कृतीचे माहेरघर मानले गेले आहे. पॅरिसमध्ये शहरामध्ये अनेक नाट्यगृहे, कलागृहे व ऑपेरागृहे आहेत. ह्यांपैकी उल्लेखनीय म्हणजे १९व्या शतकात बांधले गेलेले व २,२०० आसनक्षमता असलेले पाले गानिये व आधुनिक ओपेरा बास्तिये (Opéra Bastille) ही होत.

पॅरिस शहरामध्ये अनेक विख्यात संग्रहालये आहेत. लूव्र हे सर्वांत मोठे संग्रहालय तर म्यूझी पिकासो, म्यूझी रोदि, म्यूझी नास्योनाल दार्त मोदेर्न ही इतर काही प्रसिद्ध संग्रहालये आहेत. पॅरिस शहरात अनेक वार्षिक संगीत व कला महोत्सव आयोजित केले जातात.

शिक्षण

नवव्या शतकामध्ये पॅरिसमधील सर्व चर्चेना आपापल्या विभागामध्ये वाचन, लिखाण व मुळगणिताचे शिक्षण तर सर्व प्रमुख चर्चना भौतिकशास्त्र, कला व भाषांचे शिक्षण देण्याचे आदेश दिले गेले होते. ऐतिहासिक काळापासुन नोत्र देम ह्या प्रमुख चर्चमध्ये उच्च शिक्षण दिले गेले आहे. बाराव्या शतकामधे पॅरिस विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतरच्या काळात १९७० सालापर्यंत पॅरिस विद्यापीठ हे युरोपामधील उच्च शिक्षणाचे एक प्रमुख स्थान होते. १९७० साली पॅरिस विद्यापीठाचे विघटन करून १३ स्वतंत्र विद्यापीठे निर्माण करण्यात आली.

Thumb
पॅरिस विद्यापीठ

फ्रान्समधील सर्वांत प्रतिष्ठित प्राथमिक व माध्यमिक शाळांपैकी अनेक शाळा पॅरिस शहरात आहेत. उच्च शिक्षणासाठी पॅरिस हे युरोपातील व जगातील सर्वांत मोठ्या स्थानांपैकी एक आहे. सध्या पॅरिस महानगर भागामधे १७ सरकारी विद्यापीठे आहेत व २००५ सालच्या मोजणीनुसार ह्या विद्यापीठांमधे ३,५९,७४९ विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत.[५१]. ह्या बाबतीत पॅरिसचा युरोपामधे पहिला कमांक लागतो.[५२] ह्या व्यतिरिक्त पॅरिस भागात अनेक प्रतिष्ठित खाजगी उच्च विद्यालये (फ्रेंच: grandes écoles) आहेत ज्यांमधे २,४०,७७८ अतिरिक्त विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत.

Remove ads

खेळ

फुटबॉलरग्बी हे पॅरिसमधील सर्वांत लोकप्रिय खेळ आहेत. पॅरिस सेंट-जर्मन एफ.सी हा क्लब पॅरिसमध्ये स्थित आहे. १९९८ च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी बांधले गेलेले स्ताद दा फ्रान्स हे फ्रान्सचे राष्ट्रीय स्टेडियम पॅरिसच्या सेंत-देनिस ह्या उपनगरामध्ये स्थित आहे. येथे ८०,००० प्रेक्षकांची सोय होऊ शकते. पॅरिसमध्ये १९०० आणि १९२४ सालच्या ऑलिंपिक खेळांचे, २००७ मधील रग्बी विश्वचषकाचे तसेच १९३८ आणि १९९८ मधील फुटबॉल विश्वचषकांचे आयोजन केले गेले होते. व्हेलोद्रोम दे व्हिन्सेनेस हे १९०० ऑलिंपिक स्पर्धांचे तर स्ताद ओलिंपिक इव्ह-दू-मॅनूआ हे १९२४ ऑलिंपिक स्पर्धेचे प्रमुख स्थान होते. युएफा यूरो २०१६ स्पर्धेमधील अनेक सामने पार्क दे प्रेंस येथे तसेच अंतिम फेरीचा सामना स्ताद दा फ्रान्स येथे खेळवण्यात येईल.

टूर दे फ्रान्स ह्या जगप्रसिद्ध सायकल शर्यतीचा शेवट दरवर्षी पॅरिसमधील शॉंज एलिजे ह्या रस्त्यावर केला जातो. टेनिस हा देखील पॅरिसमधील एक लोकप्रिय खेळ आहे. येथील रोलां गारोवरील तांबड्या मातीच्या कोर्टवर दर मे महिन्यामध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा खेळली जाते. फ्रेंच ओपन ही वर्षातील चार ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे.

Remove ads

पर्यटन स्थळे

Thumb
पॅरिसमधील लोकप्रिय पर्यटनस्थळे

फ्रान्स देशातील तीन सर्वाधिक लोकप्रिय वास्तू पॅरिस शहरामध्ये आहेत: आयफेल टॉवर, नोत्र देम दे पॅरिसआर्क दे त्रायॉं. तसेच शॉंज-एलिजे हा प्रसिद्ध रस्ता, लूव्र हे जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे संग्रहालय व इतर अनेक ऐतिहासिक व प्रसिद्ध वास्तू पॅरिस शहरात आहेत.

संदर्भ

  • Vincent Cronin. Paris on the Eve, 1900-1914. New York.
  • Vincent Cronin. Paris:City of Light, 1919-1939. New York.
  • Jean Favier. Paris (French भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • Jacques Hillairet. Connaissance du Vieux Paris (French भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • Colin Jones. Paris: The Biography of a City. New York.
  • Rosemary Wakeman. The Heroic City: Paris, 1945-1958.

टिपा

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads